Maharashtra Board Exam 2025 Datesheet: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in येथे आजपासून (२१ नोव्हेंबर २०२४) दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक उपलब्द करून देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि १७ मार्च २०२५ रोजी संपेल. दहावीची परीक्षा सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत दुसरी शिफ्ट अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे.
इयत्ता बारावी सामान्य, बायफोकल आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ११ मार्च २०१५ रोजी संपेल. पहिली शिफ्ट सकाळी ११.०० ते दुपारी २.०० आणि दुसरी शिफ्ट दुपारी ०३.०० ते सायंकाळी ६.०० अशा दोन शिफ्टमध्ये होणार आहे.
दहावीच्या गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणेच उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. ज्यावर्षी या निकषात बदल होतील, त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटक यांनी घ्यावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र दहावीची परीक्षा भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि भूगोलाच्या पेपरने संपेल. बारावीच्या सामान्य आणि व्यावसायिक बोर्डाच्या परीक्षेची सुरुवात इंग्रजीच्या पेपरने होईल आणि समाजशास्त्राच्या पेपरने संपेल.अधिक माहितीसाठी उमेदवार एमएसबीएसएचएसईची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेला २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७९ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु, मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी ६१ हजार ७०८ ने कमी झाली.