Pankaja Munde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा पुढं रेटला आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा लावल्या जात आहेत. तसंच, 'बटेंगे ते कटेंगे' ही घोषणा दिली जात आहे. या घोषणेला महायुतीतील मित्रपक्षानंतर आता खुद्द भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे. पंकजा मुंडे यांनी या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.
महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका मुलाखतीत भाजपच्या या घोषणेला विरोध केला होता. आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानतो असं ते म्हणाले होते. पंकजा मुंडे यांनी आता या घोषणेस हरकत घेतली आहे.
'खरं सांगायचं तर माझं राजकारण वेगळं आहे. मी भाजपची आहे म्हणून मी या घोषणेला पाठिंबा देणार नाही. आपण विकासावरच काम केलं पाहिजे, असं माझं मत आहे. प्रत्येक माणसाला आपलंसं करणं हे नेत्याचं काम असतं. त्यामुळं असा कुठलाही विषय महाराष्ट्रात आणण्याची गरज नाही, असं पंकजा मुंडे एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत सध्या चर्चेत असलेली 'बटेंगे तो कटेंगे…' ही घोषणा सर्वात आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील सभेत बोलताना दिली होती. बांगलादेशमधील अशांततेचा संदर्भ देताना ते ‘बटेंगे तो काटेंगे... एक रहेंगे तो नेक रहेंगे’ असं म्हणाले होते. तीच घोषणा महाराष्ट्रात हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अनेक नेते हीच भाषा बोलत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी 'एक है तो सेफ है…' अशी घोषणा दिली आहे. मोदींची घोषणाही बटेंगे तो कटेंगे… याच अर्थाची असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. पंकजा मुंडे यांनी त्याबाबत मात्र वेगळं मत व्यक्त केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी वापरलेली घोषणा एका देशाच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात वापरली होती. मोदी जे काही सांगत आहेत, ते पूर्णपणे वेगळं आहे. 'मोदीजींनी सर्वांना न्याय दिला आहे. लोकांना रेशन, घर किंवा सिलिंडर देताना त्यांनी जात किंवा धर्म पाहिला नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आणि ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाआघाडी यांच्यात जोरदार चुरस आहे.