मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajendra Patani: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे वयाच्या ५९व्या वर्षी निधन

Rajendra Patani: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे वयाच्या ५९व्या वर्षी निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 23, 2024 04:58 PM IST

Rajendra Patani Passes Away: वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे.

Rajendra Patani
Rajendra Patani

Rajendra Patani Dies: वाशिम येथील कारंजा मतदारसंघातील भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे आज निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटणी यांना लिव्हर कँसर झाला होता. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरद्वारे राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली वाहिली. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणी यांचे आज निधन झाले ही अत्यंत दु:खद बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर येतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती, पण तसे झाले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

राजेंद्र पाटणी यांनी २००४ विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर कारंजा येथून विजय मिळवला होता. त्यानंतर २००९ मध्ये त्यांना राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. पुढे २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी भाजपकडून २०१४ आणि २०१९ मध्ये कारंजा विधासभेतून विजय मिळवला. त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले. अभ्यासू,अत्यंत मृदू स्वभावी व जिल्ह्याच्या विकासात महत्वाचे योगदान असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजेंद्र पाटणी यांच्या पश्चात पत्नी बबिता पाटणी एक मुलगा व एक मुलगी आहे.

 

IPL_Entry_Point