Chandrashekhar Bawankule son Audi hits several vehicles : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात तब्बल पाच वाहनांना धडक दिली. या प्रकरणी नागपूर सिताबर्डी पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे. या कारमधील दोन जणांनी मद्यपान केल्याचे केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एक वाजता ऑडी कारने तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि नंतर दुचकीला धडक दिली, या घटनेत दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची मोटार चालक अर्जुन हावरे (वय २४) व रोनित चिंतमवार (वय २७) यांच्याकडे चालवण्यासाठी दिली होती. ही मोटर संकेत यांच्या नावावर असून या मोटारीने रविवारी मध्यरात्री पाच वाहनांना धडक दिली. पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली आहे. ही मोटार जप्त करण्यात आली आहे. यावेळी गाडीवरील नंबर प्लेट गायब करण्यात आल्याचं देखील उघड झालं आहे. कार नेमिकी कुणाच्या नावावर आहे ? याची माहिती घेतली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 'ऑडी कारने मानकापूर भागाकडे जाणाऱ्या पाच वाहनाना धडक दिली. येथील टी-पॉइंटवर वाहनाने पोलो कारला धडक दिली. इतर कारचालकांनी ऑडी कारचा पाठलाग करून मानकापूर पुलाजवळ अडवली. यावेळी कारमधील संकेत बावनकुळे याच्यासह कारमधील तिघेजण पळून गेले. 'कारचा चालक अर्जुन हावरे आणि आणखी एक व्यक्ती, रोनित चित्तमवार यांना पोलो कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी त्यांचा पाठलाग करून पकडले व त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथून पुढील तपासासाठी त्यांना सिताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, ऑडी कारमधून प्रवास करणारे लोक धरमपेठेतील एका बिअर बारमधून परतत असताना ही घटना घडली. मात्र, यापैकी कोणी मद्यधुंद अवस्थेत होते की नाही, याची माहिती त्यांनी दिली नाही. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून बेदरकारपणे वाहन चालवणे आणि इतर आरोपांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हावरे आणि चित्तमवार यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांनी या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना ऑडी कार त्यांचा मुलगा संकेत याच्या नावावर असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, 'पोलिसांनी कोणताही पक्षपातीपणा न करता अपघाताचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी बोललो नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे.