Mumbai ATS action : मुंबईतून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एक तरुण पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये सापडला असून त्याने मुंबई माझगांव डॉक यार्ड येथे तयार होणाऱ्या नौदलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानी हेराला दिल्याचे उघड झाले आहे. या तरुणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे.
माझगाव डॉकयार्डमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवली जात असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएसने सापळा रचला होता. माझगाव डॉकयार्डमधील एक ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर हा माहिती पाकिस्तानी हेराला दिली जात असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार या स्ट्रक्चरल फॅब्रीकेटरला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या संपर्कात असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीने नोव्हेंबर २०२१ ते मे २०२३ याकालावधीत फेसबुक व वॉटस्अॅप या सोशल मीडिया साईटद्वारे पाकिस्तानी महिला हेराशी ओळख झाली होती. या हेराने तरुणाला हानी ट्रॅपमध्ये फसवले. आरोपीने फेसबुक वॉटस्अॅप अकाऊंटवर चॅटींग करून पाकिस्तानी हेराला भारत सरकारने प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी हा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका महिलेसोबत चॅटिंग करत होता. त्या महिलेला बरीचशी संवेदनशील माहिती त्याने पुरवली. यात नौदलाची संवेदनशील माहिती त्याने लिक केल्याचा आरोप आहे. आरोपी विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तरुण ज्या महिलेला माहिती पाठवत होता ती महिला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असल्याचा संशय आहे. तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून महिला संवेदनशील माहिती मिळवत होती. दरम्यान या पूर्वी देखील डिसेंबर २०२३ मध्ये एटीएसने २३ वर्षांच्या गौरव पाटील या तरुणाला पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
संबंधित बातम्या