Jayan patil on koyna dam water : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यामुळं निर्माण होणाऱ्या भीषण पाणीटंचाईकडं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहाचं लक्ष वेधलं. कोयना धरणाचं पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावं, अशी मागणी त्यांनी केली.
लक्षवेधी सूचनेद्वारे जयंत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. 'कोयनेतून पाणी कमी आल्यानं कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळं ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे ३२ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणं व कृष्णा नदी कोरडी न पडू देणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं ते म्हणाले.
'जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधानं करत आहेत. खासदारांनी तर राजीनामा देतो असं विधान केलं. या राजकीय दबावामुळं पाणी सोडलं जात नाही असा समज झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांमध्ये समन्वय नाही किंवा संवाद नाही नसल्याकडं जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं.
'अवघ्या २ ते ३ टीएमसी पाण्यासाठी ३२ टीएमसी पाण्यावर अन्याय करणं योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जातं. या काळात पाणी दिलं तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडलं तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. कृष्णा नदीत पाणीसाठा राहील. एप्रिल - मे महिन्यात आमच्या जिल्ह्यात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडलं जातं. ही वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी सांगली जिल्ह्याकडं वळवावं, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
संबंधित बातम्या