मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अब्दुल सत्तारांनी दलालांमार्फत जमीन वाटप केलं; राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार ठाम

Ajit Pawar : अब्दुल सत्तारांनी दलालांमार्फत जमीन वाटप केलं; राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार ठाम

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 29, 2022 02:26 PM IST

Ajit Pawar on Abdul Sattar : वाशिम येथील जमीन वाटप घोटाळ्याच्या प्रकरण अब्दुल सत्तार अडचणीत आले असून विरोधक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.

Ajit Pawar - Abdul Sattar
Ajit Pawar - Abdul Sattar

Ajit Pawar demands Abdul Sattar Resignation : वाशिम जिल्ह्यातील गायरान जमिनीच्या वाटप प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झालेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी कायम आहेत. विरोधक सत्तार यांच्या मागणीवर ठाम आहेत. गायरान जमिनीचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झालं असून यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळं या प्रकरणी विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.

विधानसभेत स्थगन प्रस्तावावर बोलताना त्यांनी सत्तार यांना लक्ष्य केलं. 'तत्कालीन महसूल राज्यमंत्री यांनी २९ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर सावरगाव येथील गायरान जमीन खाजगी व्यक्तीला वाटप केल्याची बाब उघड झाली आहे. सातत्यानं या घटना घडत आहेत. ज्यावेळी मंत्री पदाची शपथ घेऊन मंत्री कामाला सुरुवात करतात, त्यावेळी या घटना घडणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

गायरान जमिनीबाबत वेगळ्या प्रकारचे आदेश असताना पण या जमिनीचं वाटप करण्यात आलं आहे. शांताबाई जाधव यांच्या अर्जावर वाशिम जिल्हाधिकारी यांनी १७ मे २०१८ रोजी दिलेला आदेश तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांनी रद्द केला. जिल्हाधिकारी यांनी वस्तुस्थिती तपासली नाही असा चुकीचा अभिप्राय दिला गेला आहे. एक महिन्याच्या आत पाच एकर जागा नियमित करावी असे लेखी आदेश दिले आहेत. हे नियमाला धरून नाही. नियमबाह्य जमिनीचं वाटप झालं आहे. कदाचित आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला.

अशी प्रकरणं सातत्यानं समोर येत असून या सर्व प्रकरणी महसूल राज्यमंत्र्यांनी दलालांमार्फत संधान साधून जमीन वाटपाची कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकरणातील कागदपत्रे माझ्याकडे आहेत. या जमिनी प्रकरणी वेगवेगळ्या ऑर्डर निघाल्या आहेत. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करून चौकशी होईपर्यंत सबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे. त्यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून राहू नये, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

WhatsApp channel