मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Session : शेतकरी हैराण, सरकार खातं गायरान.... विधानभवन परिसरात विरोधकांची दिंडी आणि फुगड्या

Nagpur Session : शेतकरी हैराण, सरकार खातं गायरान.... विधानभवन परिसरात विरोधकांची दिंडी आणि फुगड्या

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 27, 2022 12:38 PM IST

Maharashtra Assembly Winter Session : गायरान जमीन घोटाळा व नागपूर येथील भूखंड वाटपाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत विरोधकांनी आज विधानसभेच्या बाहेर दिंडी आंदोलन केलं.

Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Session

Maharashtra Assembly Winter Session : नागपूरमधील भूखंड वाटप आणि वाशिममधील गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून महाविकास आघाडीनं शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यायला हवा, अशी विरोधकांची मागणी आहे. याच मागणीसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी दिंडी काढून आणि टाळ वाजवून आंदोलन केलं.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. विधानपरिषदेच्या आवारातून विधानसभेच्या पायर्‍यांपर्यंत दिंडी काढण्यात आली. टाळच्या आवाजानं विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. आमदारांनी फुगड्या घालून सरकारचा निषेध केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिंडीत ताल धरला. 'शेतकरी हैराण सरकार खातो गायरान... खोके लुटा कधी गायरान लुटा... सुरतला चला कधी गुवाहटीला चला... ५० द्या, कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या... भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या… सत्तारला द्या, कुणी राठोडला द्या... गद्दार बोलो कभी सत्तार बोलो... राजीनामा द्या राजीनामा द्या,भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या... जनतेकडून पैसे घेणार्‍या अब्दुल सत्तार यांचा निषेध... अशा एकापेक्षा एक घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरजारोत टाळ कुटले.

WhatsApp channel