Devendra Fadnavis : संभाजी भिडे हिंदुत्वाचं काम करतात; ते आम्हाला गुरुजी वाटतात - फडणवीस
Devendra Fadnavis praises Sambhaji Bhide : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त संभाजी भिडे यांचं जाहीर कौतुक केलं आहे.
Devendra Fadnavis praises Sambhaji Bhide : महात्मा गांधी व महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य व आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी होत आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी आज हा मुद्दा पुन्हा विधानसभेत उचलून धरला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना भिडेंवर कारवाईचं आश्वासन दिलं. मात्र, त्यावेळी त्यांनी भिडेंचं कौतुक केल्यानं प्रचंड गोंधळ झाला.
ट्रेंडिंग न्यूज
संभाजी भिडे यांच्यामुळं निर्माण झालेल्या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारच्या वतीनं निवेदन केलं. संभाजी भिडे यांच्यावरील आरोप, त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती त्यांनी दिली. तसंच, देशातील महापुरुषांचा अवमान करणारा कोणीही असला तरी त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं फडणवीस आपल्या निवेदनात म्हणाले.
भिडेंवर कारवाई करण्याचं आश्वासन देताना फडणवीसांनी त्यांचा उल्लेख 'गुरुजी' असा केला. तसंच त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. 'संभाजी भिडे हे हिंदुत्वासाठी काम करतात. त्यांचं कार्य चांगलं आहे. बहुजन समाजाच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी व किल्ल्यांशी जोडतात, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीसांच्या निवेदनावर काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. संभाजी भिडे यांच्याबद्दल बोलताना त्यांचं महिमामंडन करू नका. त्यांना तुम्ही गुरुजी बोलता. हा माणूस गुरुजी असल्याचा काय पुरावा आहे? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर आम्हाला ते गुरुजी वाटतात, तुम्हाला काय अडचण आहे, असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला.
पृथ्वीराज बाबा मधील ‘बाबा’ला काय पुरावा आहे?
‘गुरुजीचा पुरावा देता येत नाही. त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना पृथ्वीराजा बाबा म्हणतात. बाबा का म्हणतात याचा पुरावा मागायचा का?,’ अशी विचारणा फडणवीस यांनी केली. भिडे यांच्यावर कारवाई होईलच, त्याचबरोबर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल चुकीचा प्रचार करणाऱ्या काँग्रेसच्या 'शिदोरी' या मुखपत्रावरही कारवाई होईल, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.