विधानसभेचं कामकाज सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर या एका फोल्डरमध्ये पैशाच्या नोटा टाकून कर्मचाऱ्याला देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू होताच बोर्डीकर यांनी 'एक्स' पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह काहीही नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्यानं एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी १००० रुपये माझ्या पीएकडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पीएकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिलं होतं. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही, असं बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.
मीडियानं बातम्या देताना किमान संबंधितांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं, असंही बोर्डीकर यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढं म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर या व्हिडिओची क्लिप व्हायरल केली आहे. आमदार मॅडम फाइलमध्ये पैसे का ठेवत असतील, असा प्रश्न एकानं व्हिडिओ पोस्ट करताना विचारला आहे. तर, इतरांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मेघना बोर्डीकर यांनी खुलासा म्हणून केलेल्या पोस्टवरही नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्दी आणि कणकणीसाठी हजार रुपये लागतात असं म्हणत एकानं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
पीएकडं गोळ्यांसाठी पैसे नाहीत का, असा प्रश्न एकानं उपस्थित केला आहे.
काही नेटकऱ्यांनी मेघना बोर्डीकर यांचं समर्थन करत चॅनेलवाल्यांवर कारवाईचं पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. तर, एकानं अब्रुनुकसानीची नोटीस पाठवण्याचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या