मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  …म्हणून उद्धव ठाकरेंनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाला परवानगी नाकारली; भाजपचा आरोप

…म्हणून उद्धव ठाकरेंनी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाला परवानगी नाकारली; भाजपचा आरोप

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 03, 2023 07:31 PM IST

Ashish Shelar on Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला.

Uddhav Thackeray - Lata Mangeshkar
Uddhav Thackeray - Lata Mangeshkar

Ashish Shelar on Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya : भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर खळबळजनक आरोप केला. स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं होऊ घातलेलं संगीत विद्यालय रखडण्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच जबाबदार होतो. त्यांनी जाणीवपूर्वक तसं केलं, असा दावा शेलार यांनी केला.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर भाषण करताना शेलार बोलत होते. 'लता मंगेशकर यांच्या निधनानंतर तत्कालीन आघाडी सरकारनं त्यांच्या नावानं महाराष्ट्रात संगीत विद्यालय सुरू करण्यात येईल अशी घोषणा केली. या विद्यालयाच्या परवानगीची फाईल त्यावेळी तयार झाली आणि ती तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडं मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र, ती मंजूर केली गेली नाही. मंगेशकर कुटुंबीयांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला, हेच फाइल मंजूर न होण्यामागचं कारण होतं, असा आरोप शेलार यांनी केला.

'मुंबईतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना बोलावलं नव्हतं. त्यामुळंच कद्रू मनाच्या मुख्यमंत्र्यांनी संगीत विद्यालयाची परवानगी रद्द केली होती, अशी टीकाही शेलार यांनी केली.

'सुदैवानं सरकार बदललं. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आणि पुन्हा त्या संगीत विद्यालयाला परवानगी देण्यात आली, असं शेलार म्हणाले. संगीत विद्यालय सुरू केल्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे त्यांनी आभार मानले. आता या विद्यालयाला विद्यापीठाची मान्यता देण्यात यावी, तसंच तिथं संगीत लायब्ररी सुरू करण्यात यावी, आंतरराष्ट्रीय दर्जाची वाद्यं इथं उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही शेलार यांनी यावेळी केली.

 

WhatsApp channel