Maha Assembly Session : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार नवीन मोबाइल, महिला व बाल विकास मंत्र्यांची माहिती
Anganwadi Sevika mobiles : राज्यातील अंगणवाडी सेविकांना नवे आणि अद्ययावत मोबाइल फोन लवकरच मिळतील, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिली.
Maharashtra Assembly Monsoon Session : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांवर कार्यवाही सुरू आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना मोबाइल फोन दिले जातील, अशी माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
ट्रेंडिंग न्यूज
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात एक लाखापेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन कामासाठी देण्यात आलेले मोबाइल फोन सदोष व कालबाह्य झाले आहेत. त्यांना चार महिन्यांत अद्ययावत मोबाइल उपलब्ध करून देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यावर सरकारनं काय कार्यवाही केली, असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
तसंच, महिला बालविकास विभागाकडून मराठीमध्ये पोषण ट्रॅकर भरण्यासाठी ॲप विकसित करून दिलं गेलेलं नाही हे खरं आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून लाखो बालके व माता यांची अद्ययावत आकडेवारी नोंदवून सरकारला धोरण ठरवताना त्याचा फायदा होईल, यासाठी हे ॲप मराठीत असावं, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या लेखी उत्तर दिलं. त्यानुसार, मोबाइल उपलब्ध करून देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारनं अंगणवाडी सेविकांसाठी मराठीसह इतर स्थानिक भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा पोषण ट्रॅकर ॲपमध्ये उपलब्ध करून दिली आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या जीईएम पोर्टलवर मोबाईल फोन खरेदी संदर्भात निविदा प्रकाशित करण्यात आली आहे, त्या पुढील प्रक्रिया सरकारच्या खरेदी धोरणानुसार पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.