MaharashtraAssembly Winter Session : उपराजधानी नागपूरमध्ये १६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे आज (शनिवार) सूप वाजले. पुढील अधिवेशन मुंबईत ३ मार्च २०२५ पासून सुरू होईल, अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या संदेश वाचनानंतर केली. ६ दिवस चाललेल्याया अधिवेशनात बीड, परभणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासह शेतकरी व विविध प्रश्नांवरून सभागृहात गदारोळ झाला. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण १७ विधेयके मंजूर झाली असून२विधेयके प्रलंबित आहेत. संयुक्त समितीकडे एक आणि विधान सभेत एक विधेयक प्रलंबित आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपुरात पार पडलं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७८ सदस्य नवीन निवडून आले आहेत, तर ५ जण विधानपरिषदेवरून विधानसभेत आले असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. अधिवेशनाच्या कामकाजात परभणी, बीड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान याच विषयांवर चर्चा झाली. राज्यपाल अभिभाषण आणि ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यावरील चर्चेनंतर शेवटच्या दोन दिवसातच विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्ताव निमित्ताने शेतकरी, आदिवासी प्रश्न, विदर्भ-मराठवाड्याची चर्चा झाली. सभागृहाबाहेर बनावट औषध पुरवठ्याचा मुद्दाही चर्चेला आला. नागपुरात अधिवेशन होत असतानाही विदर्भाचे मुद्दे दुर्लक्षित राहिल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकूण ६ बैठका झाल्या, ४६ तास २६ मिनिटे कामकाज झाले असून सभागृहाची १० मिनिटे वाया गेलेली आहेत. सहा दिवस दररोज एकूण ७ तास ४४ मिनिटे सरासरी कामकाज झाल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली. दरम्यान,पुढील अधिवेशन ३ मार्च पासून मुंबईत सुरू होईल, तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे, अशी माहिती नार्वेकरांनी दिली.
विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विदर्भ,मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगीक प्रकल्प पूर्णत्वाला नेणार असून मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली स्टील सिटी म्हणून उदयास येत असून येत्या तीन वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद आटोक्यात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांच्या गैरप्रकरांना आळा घालण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धानाला गतवर्षीप्रमाणेच हेक्टरी २० हजार बोनस,भविष्यातील स्टील सिटी म्हणून विकसित होणारा गडचिरोली जिल्हा तीन वर्षात नक्षलमुक्त करण्यासोबतच शेतकरी कर्जमाफीसह आमच्या जाहीरनाम्यातील सर्व बाबींची पूर्तता केली जाईल. मुंबई गोवा महामार्गाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण केले जाईल. पुणे ते संभाजीनगर नवा ग्रीन फील्ड महामार्ग केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत बोलत होते.
संबंधित बातम्या