आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तुफान टोलेबाजी केली. आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, त्यांचे केवळ पैशावर प्रेम आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांच्याकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली होती जी अविभाजित पक्षाने देणग्यांद्वारे जमा केली होती आणि यावरून ठाकरे गटाला फक्त पैशाची हाव असल्याचे दिसूनअसल्याचा हल्लाबोल शिंदे यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी ५० खोक्यांच्या टीकेचा मुद्दा उपस्थित करत ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्याला मिळाल्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या गटाला आपण ५० कोटी रुपये दिले, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, खूप गोष्टी आहेत, बोलता येतील, पण एक संयम आम्ही बाळगतो, आम्हाला बोलता येत नाही हे कुणी समजू नये. ५० खोके म्हणून आम्हाला हिणवता. आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, रोज शिव्याशाप देता आणि आमच्याकडेच ५० कोटी रुपये आमचे द्या म्हणून पत्र देता?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे.''