मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dhananjay Munde: गोगलगायींचं करायचं काय?; धनंजय मुंडेंनी वेधलं शेतकऱ्यांच्या वेगळ्याच समस्येकडं लक्ष

Dhananjay Munde: गोगलगायींचं करायचं काय?; धनंजय मुंडेंनी वेधलं शेतकऱ्यांच्या वेगळ्याच समस्येकडं लक्ष

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 22, 2022 03:12 PM IST

Dhananjay Munde on Crop Damage: माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होत असलेल्या एका विचित्र त्रासाकडं सरकारचं लक्ष वेधलं.

Dhananjay Munde
Dhananjay Munde

Maharashtra Assembly Monsoon Session: अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा सध्या गाजत असताना व ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत शेतकऱ्यांच्या वेगळ्याचं समस्येकडं सरकारचं लक्ष वेधलं.

धनंजय मुंडे यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. 'बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तीन-चार वेळा पेरणी करूनही शेतकऱ्यांच्या हाती पीक लागलं नाही. त्यामुळं कपाशीवर पडलेल्या बोंडअळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणं गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे, झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता या शेतकऱ्यांना अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारच्या वतीनं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावर उत्तर दिलं. सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असं सत्तार यांनी सांगितलं.

यापूर्वी तीन वेळा धनंजय मुंडेंनी केलाय पाठपुरावा

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायींनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार गोगलगायी गोळा करून त्यावर मीठ टाकून शेतकरी त्यांना नष्ट करत आहेत. मात्र, पुन्हा पेरणी केली तर तीच परिस्थिती आहे. यामुळं तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायींचा त्रास कमी झालेला नाही आणि पीकही हाती लागत नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे, असं मुंडे यांनी निदर्शनास आणलं. या आधीही त्यांनी तीन वेळा राज्य शासनाकडं याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या