Maharashtra Monsoon Session2024 : राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. यामध्ये महिला, शेतकरी, वारकरी व युवकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एका योजनेची घोषणा केली आहे. राज्यात' मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' (Chief Minister Pilgrimage Scheme) सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, यासंदर्भात धोरण, पॉलिसी, नियम ठरवून याबाबत निर्णय घेतला जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने'ची घोषणा केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांची यात्रा घडवणार आहे.
शिवसेनाआमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडत ही मागणी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही योजना लागू करत असल्याचे सांगत म्हणाले की, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत, आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली जाणार आहे.त्यासाठी धोरण तयार करून त्याची नियमावली बनवली जाईल. त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीने, ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचा उल्लेख केला. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विविध योजनांचा उल्लेख आपल्या भाषणात केला.
दरम्यान शिवसेने शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडत म्हटले होते की, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो. या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली.
संबंधित बातम्या