Maharashtra Assembly Eletion 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी महायुती सरकारच्या कामाचा हिशोब मांडला आहे. महायुती सरकारच्या काळात राज्यात महापुरुषांचा अपमान, महिला अत्याचार, बेरोजगारी आणि महागाई वाढली, अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून आणण्याचे शरद पवारांनी जनतेला आवाहन केले आहे.
शिवछत्रपतींच्या रूपाने दिल्लीच्या मग्रूर तख्ताला आव्हान देणारा, देशाच्या संरक्षणासाठी पानिपतच्या रणभूमीमध्ये रक्त सांडलेला, संकटकात हिमालयाच्या मदतीला सह्याद्री म्हणून धावून गेलेला, फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राची महायुती सरकारने काय अवस्था केली? राज्यात शिवशिल्पाचा आणि महापुरुषांचा अपमान, महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगार, महागाई, ढासळलेली कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार वाढला आहे. आपल्याला असाच महाराष्ट्र हवा आहे का? असा प्रश्न शरद पवार यांनी जनतेला लिहिलेल्या पत्रातून उपस्थित केला आहे.
'महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्यपालासारख्या संविधानिक पदावरील व्यक्तीने सावित्रीबाई- ज्योतिबा फुले यांच्या वैवाहिक जीवनाची खिल्ली उडवली होती, हे आपण विसरता कामा नये. या सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा विटंबना केली. मालवणच्या समुद्र किनारी शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्र हळहळला आहे. महायुतीला सत्तेतून खाली खेचून त्यांना जाब विचारायचा आहे. त्यासाठी मला आपली साथ हवी', असेही पत्रात नमूद करण्यात आले.
'महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, एअरबस, औषधनिर्मिती पार्क, हिंजवडीतील ३७ आय.टी. कंपन्या यांसारखे मोठे उद्योग बाहेर गेल्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. या सरकारच्या काळात फक्त उद्योगच नव्हेतर मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आय.एफ.एस.सी.), राष्ट्रीय मरीन पोलीस अकादमी या महत्वाच्या संस्था गुजरातला हलवण्यात आल्या आहेत. या महायुती सरकारच्या काळात स्पर्धा परिक्षांची वेळापत्रके कोलमडली, परिक्षांचे पेपर फुटले, नोकर भरती प्रक्रिया रखडल्या आणि शिष्यवृत्या बंद झाल्या आहेत', असेही शरद पवारांनी म्हटले आहेत.
'शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पिकांना हमीभाव मिळाला नाही. सोयाबीन, कापूस, रुस, दूधाचे भाव गडगडले आणि खते-बी-बियाणांचे भाव गगनाला भिडले. शेतीची अशी उफरटी अवस्था झाली आहे. केंद्र सरकारने कांदाच्या निर्यातीवर बंदी घातली. ती उठवण्यासाठी मला शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरावे लागले. निर्यात बंदी उठली, पण त्याचा फायदा निर्यातदार कंपन्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि दुसरीकडे नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, तेल, डाळी इतक्या महागल्या आहेत की, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून पडले आहे' असेही शरद पवार म्हणाले.
पुढे शरद पवार म्हणाले की,' महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकाळला आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने मुंबईकडे येणारे काही टोल बंद केले. पण सरकारी कार्यालये आणि मंत्रालयाच्या वाटेवरचे टोल कधी बंद होणार? हा खरा प्रश्न आहे. मंत्रालयाच्या अवतीभोवती आलीशान इमारतीत भ्रष्टाचाराची सुविधा केंद्रे सुरू आहेत. शिवछत्रपतीच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे सरकार मूठभर दलाल मंडळींच्या माध्यमातून मंत्रालयाचा कारभार पाहत आहेत. शाळेच्या गणवेश वाटपात प्रचंड भ्रष्टाचार झाला. राज्याच्या विकासासाठी कोणतेही दूरगामी धोरण नाही, नवीन योजना नाहीत. 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी अवस्था राज्यकारभाराची झाली आहे.'
‘महाराष्ट्राचे गतवैभव मिळवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत हातात एकजुटीची मशाल घेऊन स्वाभिमानाची तुतारी फुंकण्यासाठी सज्ज व्हा, ज्यांनी सत्तेचा वापर करून सुसंस्कृत राजकारण नासवले, दूसरे पक्ष फोडले, घरे फोडली, नाती- गोती तोडली, जाती-पातींमध्ये वैर पसरवले, आरक्षण देण्याऐवजी कोरति याचिकाकर्ते उभे केले त्यांना आता धडा शिकवायचा आहे. १०५ हुतात्म्यांच्या रक्तातून, शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला महाराष्ट्र कुणापुढे झुकणारा नाही, हे आपल्याला पुन्हा एकदा दाखवून द्यायचे आहे. चला तर एकत्र येऊया आणि महाराष्ट्रद्रोह्यांच्या हातून राज्य वाचवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन रयतेच स्वाभिमानी राज्य आणूयात’, असे आवाहन शरद पवार यांनी जनतेला केले.