Ramraje Naik Nimbalkar to join ncp-sp : लोकसभा निवडणुकीत ‘पॉवर’ दाखवल्यानंतर आता शरद पवार यांनी विधानसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षात प्रवेशासाठी रांग लागली असून पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक दिग्गज नेता गळाला लागला आहे. अजित पवारांसोबत असलेले ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार असल्याचं बोललं जातंय. निंबाळकर हे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत.
रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावान म्हणून ओळखले जात. त्यामुळं आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद आणि विधान परिषदेचं सभापतीपदही मिळालं होतं. दीडेक वर्षांपूर्वी अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर निंबाळकर हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र आता ते वेगळ्या विचारात आहेत.
रामराजे यांच्या स्वगृही परतण्याच्या निर्णयास स्थानिक राजकारणाचे पदर असल्याचंही बोललं जातं. रामराजे यांना फलटणमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, अजित पवार यांनी तिथून दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केल्यानं ते नाराज आहेत. याशिवाय, लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात रामराजे यांनी उघड भूमिका घेतली होती. त्यातून शाब्दिक चकमकीही झडल्या होत्या. सध्या साताऱ्याचे खासदार असलेले उदयनराजे भोसले यांच्याशीही त्यांचं फारसं सख्य नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते या निर्णयाप्रत आल्याचं बोललं जातंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, रामराजे यांनी शनिवारी रात्री फलटण इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र, हा मेळावा ही केवळ औपचारिकता असल्याचं बोललं जात असून रामराजेंचा निर्णय झाल्याचं बोललं जातंय.
अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतराचं वृत्त फेटाळून लावलं आहे. 'ही माहिती अत्यंत चुकीची आहे. कार्यकर्त्यांशी हितगुज केलं म्हणून लगेच ते शरद पवारांच्या पक्षात जाणार, असा त्याचा अर्थ होत नाही. ते घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाहीत. प्रसंगी आमचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे त्यांच्याशी चर्चा करतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.
भाजपचे इंदापूर मतदारसंघातील नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकताच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन पाटलांना सोबत घेऊन पवारांनी इंदापूर तालुक्यात अजितदादांना शह देण्याची खेळी खेळली आहे. तर, निंबाळकरांना सोबत घेऊन महायुतीला फलटण व माढ्यात धक्का देण्याचा पवारांचा विचार असल्याचं बोललं जातं.
संबंधित बातम्या