Maharashtra Assembly Elections : शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेली पहिलीच विधानसभा निवडणूक उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषत: मुंबईवर वर्चस्व राखणं ठाकरेंच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यामुळंच अखेरच्या क्षणी त्यांनी रणनीतीत बदल केला असून मुंबईतील दोन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर १५ आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुंबईतील सर्वाधिक आमदार आहेत. सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय नुकताच 'मातोश्री' निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. तसंच, कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, आता सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर येत आहे.
मुंबईतील शिवडी व चेंबूर विधानसभेतील उमेदवारांच्या नावावर फेरविचार सुरू असल्याचं समजतं. शिवडीमध्ये सध्या अजय चौधरी हे आमदार आहेत. विधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे ते गटनेते आहेत. तर, चेंबूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व प्रकाश फातर्पेकर करत आहेत. या दोन्ही जागांवर दोन तुल्यबळ पदाधिकाऱ्यांनी दावा केला आहे.
शिवडीमध्ये सुधीर साळवी यांंनी उमेदवारी मागितली आहे. सुधीर साळवी हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते असून लालबागचा राजा मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. या मतदारसंघात मनसेनं बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील सर्व पक्ष नांदगावकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इथली निवडणूक आव्हानात्मक होणार आहे. त्यामुळंच ठाकरेंची शिवसेना इथं उमेदवार बदलण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघात अरविंद सावंत यांचं मताधिक्य घटलं होतं. ही बाब चौधरी यांच्या विरोधात गेल्याचं बोललं जातं.
चेंबूरमध्ये माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. महापालिकेत विविध समित्यांवर काम केलेले पाटणकर हे मतदारसंघातील परिचित चेहरा आहे. त्यांच्या दावेदारीमुळं इथं पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेतील फुटीनंतरही साथ दिल्यामुळं विद्यमान आमदारांना डावलणं तितकंसं सोपं नाही. उद्धव ठाकरे हा पेच कसा सोडवतात याकडं आता लक्ष लागलं आहे.
अजय चौधरी व प्रकाश फातर्पेकर यांची उमेदवारी नाकारली जाण्याच्या चर्चेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. एकाच दिवशी सर्वांना बैठकीला बोलावलं जात नाही म्हणून त्या दिवशी काही लोकांना बोलावलं नव्हतं. चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. विधानसभेतील गटनेते आहेत. त्यांच्याबद्दल कोणी अफवा पसरवत असेल तर ते चुकीचं आहे, असं राऊत म्हणाले.