इम्तियाज जलिल यांच्या पराभवानंतरही असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने (AIMIM) ने महाराष्ट्रात आपले खाते उघडले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय सेक्युलर लार्जेस्ट असेंबली महाराष्ट्राचे आसिफ शेख रशीद यांचा अवघ्या ८४ मतांनी पराभव केला आहे.
मालेगाव शहर राज्यातील सर्वात संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मुस्लिम बहुल वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. एमआयएमने २०१९ मध्ये इस्माईल अब्दुल खलीक यांना तिकीट दिले होते. असदुद्दीन ओवैसी यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तर महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाने या मतदारसंघात दिवंगत समाजवादी नेते निहाल अहमद यांच्या कन्या शाने-ए-हिंद डिग्निटी यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच आसिफ शेख हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे मुस्लीम समाजाचे वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमला राखण्यात यश आले आहे. मुफ्ती यांचा केवळ ८४ मतांनी निसटता विजय झाला आहे.
मालेगाव मध्य मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या शाने-ए-हिंद डिग्निटी तिसऱ्या तर काँग्रेसचे इजाज अजीज बेग चौथ्या स्थानावर आहेत. येथे ९ उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली आहेत. या जागेवर नोटाला १०८९ मते पडली. २०१९ च्या निवडणुकीतही एआयएमआयएमला मालेगाव मध्य मतदारसंघात यश मिळाले होते. २०१९ मध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातून मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक यांनी निवडणूक जिंकली होती.
मालेगाव मध्य हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या निवडणुकीत येथे `एमआयएम` पक्षाने येथे बाजी मारली होती. यंदा काँग्रेसचा हा मतदारसंघ समाजवादी पार्टीने घेतला आहे.
ओवैसी यांच्या पक्षाने महाराष्ट्रात १४ उमेदवार उभे केले होते. यामध्ये माजी आमदार वारिस पठाण आणि औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलील यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या अतुल सावे यांनी अवघ्या ११७७ मतांनी जलील यांचा पराभव केला. तर, भिवंडी मतदारसंघातून वारिस पठाण पाचव्या स्थानावर आहेत. त्यांना १५८०० मते मिळाली.