पुरुषोत्तम जाधव यांची जय्यत तयारी! वाई विधानसभेच्या लढतीकडं राज्याचं लक्ष
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुरुषोत्तम जाधव यांची जय्यत तयारी! वाई विधानसभेच्या लढतीकडं राज्याचं लक्ष

पुरुषोत्तम जाधव यांची जय्यत तयारी! वाई विधानसभेच्या लढतीकडं राज्याचं लक्ष

HT Marathi Desk HT Marathi
Oct 28, 2024 08:00 PM IST

Wai Vidhan Sabha Election : सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून कट्ट्रर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव हे अपक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळं या लढतीकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

पुरुषोत्तम जाधव बाजी पलटवणार! वाई विधानसभेतील लढतीकडं राज्याचं लक्ष
पुरुषोत्तम जाधव बाजी पलटवणार! वाई विधानसभेतील लढतीकडं राज्याचं लक्ष

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील सत्ता राखण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते वाई विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. जाधव यांचा जनसंपर्क आणि तयारीमुळं या लढतीकडं आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

पुरुषोत्तम जाधव हे कडवट शिवसैनिक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जाधव यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जाधव यांनी खंबीरपणे त्यांना साथ दिली होती. गेल्या अडीच वर्षात जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. वाडीवस्तीवर जाऊन संघटना बांधली.

लोकसभा निवडणुकीत ते साताऱ्यातून इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ भाजपला गेल्यानं त्यांना माघार घ्यावी लागली. मात्र विधानसभेसाठी त्यांनी जय्यत तयारी केली. वाई मतदारसंघातून त्यांनी खूप आधीपासूनच तयारी केली. मात्र, महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळं जाधव यांनी अपक्ष शड्डू ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

मकरंद पाटील यांच्यावर डागली तोफ

अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं वाईतून पुन्हा एकदा मकरंद पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुणादेवी पिसाळ यांना रिंगणात उतरवलं आहे. मागील १५ वर्षे आमदार असलेले मकरंद पाटील हे निष्क्रिय लोकप्रतिनिधी असून त्यांनी या मतदारसंघात काहीही केले नसल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याउलट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आलेला विकासकामाचा निधी रोखण्याचं काम त्यांनी केलं, असं जाधव यांचं म्हणणं आहे. याच निष्क्रियतेला उत्तर म्हणून पुरुषोत्तम जाधव रिंगणात उतरले आहेत.

पुरुषोत्तम जाधव चमत्कार करणार?

पुरुषोत्तम जाधव हे झुंजार नेते आहेत. विनम्र स्वभावामुळं त्यांनी गावाखेड्यात माणसं जोडली आहेत. सातारा जिल्ह्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. तरुण कार्यकर्त्यांची मोठी ताकद त्यांच्यासोबत आहे. यापूर्वी त्यांनी दिग्गजांपुढं अपक्ष म्हणून निवडणूक लढताना लाखाच्या वर मतं घेत ताकद दाखवून दिली होती. त्यांच्या रूपानं मकरंद पाटील यांच्यापुढं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर