Maharashtra Elections : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Elections : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?

Maharashtra Elections : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?

Published Oct 28, 2024 04:35 PM IST

NCP-SP Candidate List : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात ७ उमेदवारांचा समावेश आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची नवी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ७ उमेदवारांची नवी यादी जाहीर, दौंडमध्ये कुणाला संधी?

Maharashtra Vidhan Sabha Elections : विधानसभा निवडणूक २०२४ साठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात ७ उमेदवारांचा समावेश आहे. काटोलमधून अनिल देशमुख यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर, दौंडमध्ये रमेश थोरात यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

लोकसभेतील दणदणीत यशानंतर शरद पवार हे नव्या जोमानं विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीचं जागावाटप करताना मित्रपक्षांशी कुठलाही वाद न घालता शरद पवार यांच्या पक्षानं महत्त्वाचे मतदारसंघ स्वत:कडं राखण्यात यश मिळवलं आहे. यातील बहुतेक मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा अजित पवारांच्या उमेदवारांशी सामना होणार आहे.

याआधी शरद पवारांच्या पक्षानं जवळपास ८५ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता आणखी ७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात एका महिला उमेदवाराचा समावेश आहे. तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. 

नव्या यादीतील ७ उमेदवार व त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे…

माण - प्रभाकर घार्गे

काटोल - सलील अनिल देशमुख

खानापूर - वैभव सदाशिव पाटील

वाई - अरुणादेवी पिसाळ

दौंड - रमेश थोरात

पुसद  - शरद मैंद

सिंदखेडा - संदीप बेडसे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळं जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवार जाहीर करण्याचा धडाका लावला आहे.

महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आपले बहुतेक उमेदवार जाहीर केले आहेत. तर, उर्वरीत जागांवर अद्यापही घासाघीस सुरू आहे. महायुतीचीही तीच परिस्थिती आहे. भाजपनं आज २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

युगेंद्र पवार यांनी भरला अर्ज

शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार हे देखील यावेळी उपस्थित होते. युगेंद्र पवार यांची लढत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्यासाठी युगेंद्र पवार यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता. तेव्हापासूनच त्यांनी विधानसभेची तयारी केली होती. त्यामुळं यावेळी या मतदारसंघात काय होणार याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या