Maharashtra elections news marathi : बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील काका-पुतण्यांमध्ये लढत होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडं साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, निकालाआधी सुरू असलेली टीका-टिप्पणीही लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा खोचक टोला हाणला आहे.
निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना सध्याच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात साहजिकच बारामतीशी संबंधित प्रश्न आला.
बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनंतरच मीच वाली आहे, असं अजित पवार वारंवार लोकांना सांगत आहेत, याकडं पत्रकारांनी शरद पवार यांचं लक्ष वेधलं. त्यावर शरद पवार यांनी खोचक उत्तर दिलं. 'उद्या कुणी म्हणत असेल की मीच या देशाचा प्रमुख आहे तर म्हण बाबा. माझी काही तक्रार नाही. पण हे लोकांनी म्हटलं पाहिजे. स्वत: बोलून काय उपयोग, असा टोला शरद पवार यांनी हाणला.
लोकसभेला बारामतीकरांनी गंमत केली. यावेळी गंमत केली तर तुमचीच गंमत होईल, असं अजित पवार एका सभेत म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, ‘गंमत केली म्हणजे काय? तुम्हाला मतं दिली नाही हेच ना. तो लोकांचा अधिकार आहे. त्यांना योग्य वाटतं ते त्यांनी केलं.’
भाजपकडून महाविकास आघाडीवर होणाऱ्या व्होट जिहादच्या आरोपांनाही शरद पवार यांनी यावेळी उत्तर दिलं. 'व्होट जिहाद हा शब्द आम्ही कधीच वापरलेला नाही. भाजप, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी हे सगळं करत आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यातून दिसतो. एखाद्या मतदारसंघात एखाद्या समाजाची संख्या जास्त असते. पुण्यातल्या काही भागात एक विशिष्ट समाज आहे. हिंदू समाज आहे, तिथं भाजपला जास्त मतदान होतं. आम्हाला याची सवय आहे. इथं असंच होईल हे आम्ही गृहीत धरलेलं असतं, पण म्हणून आम्ही त्याला व्होट जिहाद म्हणत नाही. आमचा या सगळ्याला विरोध आहे, असं शरद पवार म्हणाले.