Maharashtra Election : उमेदवारांच्या घोषणेआधीच अजित पवारांकडून १५ नेत्यांना एबी फॉर्म वाटप; कोणा-कोणाला मिळाली संधी?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election : उमेदवारांच्या घोषणेआधीच अजित पवारांकडून १५ नेत्यांना एबी फॉर्म वाटप; कोणा-कोणाला मिळाली संधी?

Maharashtra Election : उमेदवारांच्या घोषणेआधीच अजित पवारांकडून १५ नेत्यांना एबी फॉर्म वाटप; कोणा-कोणाला मिळाली संधी?

Updated Oct 21, 2024 08:52 PM IST

Vidhan Sabha Eelection 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच १६ जणांना एबी फॉर्म दिले आहेत.

अजित पवारांकडून १५ नेत्यांना एबी फॉर्म वाटप
अजित पवारांकडून १५ नेत्यांना एबी फॉर्म वाटप

विधानसभा  निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी भाजपाने ९९ जणांची पहिली यादी प्रसिद्ध केल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आज १६ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. अजित पवार यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा न करता थेट एबी फॉर्म वाटण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये अजून वाद सुरू असताना महायुतीतील जागावाटप फायनल झाल्याचे बोलले जात आहे. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी  जाहीर केली आहे.  तर शिवसेनेची यादीही उद्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या  राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच १६ जणांना एबी फॉर्म दिले आहेत. एबी फॉर्म दिले असले तरी यादी जाहीर होईपर्यंत माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना राष्ट्रवादीने या उमेदवारांना दिल्या आहेत. राष्ट्रवादीतील काही आमदार आणि इच्छुक नेते आज अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले होते. त्यातील काहींना एबी फॉर्म देण्यात आले.

बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती येथे प्रचारासाठी गाड्याही सज्ज झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांनी ‘या’ नेत्यांना दिले एबी फॉर्म

अजित पवारांनी छगन भुजबळ, अतुल बेनके, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, दौलत दरोडा, राजेश पाटील, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, भरत गावित व बाबासाहेब पाटील यांना पक्षाचे एबी फॉर्म दिले आहेत.

या दोन मतदारसंघात भाजपचे नेते लढणार घड्याळ चिन्हावर -

सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि वाळवा विधानसभा मतदारसंघात भाजप नेते इच्छुक आहेत. मात्र येथे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने भाजप नेत्यांना घड्याळ चिन्हावर लढावे लागणार आहे. वाळवा मतदारसंघात भाजपाच्या निशिकांत पाटील यांना तर तासगाव विधानसभेतून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांना घड्याळ चिन्हावर उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. तसे झाल्यास दिवंगत आरआर पाटील यांनी घड्याळ चिन्ह घराघरात पोहोचवण्याचे काम केले, त्यांचा मुलगा रोहित पाटील यांना घड्याळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या