Shiv Sena UBT First candidate List : महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या ११ उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे. अप्रत्यक्षपणे ही ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादीच असल्याचं बोललं जात आहे.
एबी फॉर्म देण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार नाशिक जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या विरोधात बाळ माने यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, मुंबईतील मागाठाणे मतदारसंघात माजी नगरसेवक उदेश पाटेकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यांची लढत शिंदे गटात गेलेले विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी होईल.
मुंबईतील माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे. महेश सावंत हे कट्टर शिवसैनिक असून त्यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांना जोरदार लढत दिली होती. सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेचे माहीम विभागप्रमुख आहेत.
एबी फॉर्म मिळालेल्या बहुतेक उमेदवारांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काहींनी आजच पक्षात प्रवेश केला आणि त्यांना तिकिटाची लॉटरी लागली. त्यात के. पी. पाटील, अनुराधा नागवडे, माजी आमदार बाळ माने यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये बहुतेक जागांवर सहमती झाली आहे. मात्र, ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमध्ये विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून तीव्र मतभेद आहेत. त्या जागांवरील उमेदवार निश्चिती अद्याप झालेली नाही. हा तिढा कधी सुटणार याकडं आता संबंधित मतदारसंघांतील इच्छुकांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मागाठणे - उदेश पाटेकर
मालेगाव बाह्य - अद्वय हिरे
नाशिक मध्य - वसंत गिते
नाशिक पश्चिम - सुधाकर बडगुजर
राधानगरी - के पी पाटील
लोहा कंधार - एकनाथ पवार
रत्नागिरी - बाळा माने
नांदगाव - गणेश धात्रक
श्रीगोंदा विधानसभा - अनुराधा नागवडे
सांगोला - दीपक आबा साळुंखे पाटील
सोलापूर दक्षिण - अमर पाटील
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २९ ऑक्टोबर ही आहे.
संबंधित बातम्या