Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद

Devendra Fadnavis: मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही; फडणवीसांची मतदारांना भावनिक साद

Nov 11, 2024 09:17 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घर नसलेले पहिले मुख्यमंत्री आहेत.

मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही- फडणवीस
मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे, ज्यांचं मुंबईत घर नाही- फडणवीस

Devendra Fadnavis News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे.महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव मुख्यमंत्री आहे, ज्याचे मुंबईत स्वतःचे घर नाही. मी कधीही स्वत:चे घर भरण्याचा विचार केला नाही. कधीही स्वतःचे उद्योग, व्यवसाय, शिक्षण संस्था उभारल्या नाहीत, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस हे त्यांचे मूळ गाव दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढवत आहेत, जिथे ते २००९ पासून आमदार आहेत.

‘मी २५ वर्षे फक्त समाजासाठी काम केले आहे आणि लोकोपयोगी कामे केली आहेत. मला सांगायला आनंद होत आहे की, महाराष्ट्रातील आजवरच्या वीस मुख्यमंत्र्यांपैकी मी एकमेव असा मुख्यमंत्री आहे की, ज्यांच्याकडे मुंबईत घर नाही. माझ्या मालकीचे नागपुरात घर आहे. मी नागपूरकर असल्याचा मला अभिमान आहे’, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार संभाळला आहे. दरम्यान, २०२२ मध्ये महायुतीने आपले सरकार स्थापन केले, तेव्हा शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. फडणवीस सध्या मुंबईतील मलबार हिल येथील 'सागर' बंगला येथे आपल्या शासकीय निवासस्थानी राहत आहेत.

दक्षिण पश्चिम नागपूर येथून तीन वेळा आमदार

२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने फडणवीस यांना त्यांचे मूळ गाव दक्षिण पश्चिम नागपूर येथून उमेदवारी दिली, जिथून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. भाजप यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत निवडणूक लढवत आहेत.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

विधानसभा निवडणुकीला आता आठवडाभरही अवधी उरला असताना सर्वच पक्ष आणि राजकीय नेत्यांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने नेते मतदारांना भावनिक आवाहन करत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही दुसरी थेट लढत असेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर