महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत मतदान करता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतके आहेत. ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यात एकूण महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. तर ६१०१ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग (PwD Voters) मतदारांची एकूण संख्या ६ लाख ४१ हजार ४२५ इतकी असून सेना दलातील (Service Voters) मतदारांची संख्या १ लाख १६ हजार १७० आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३ महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम मशीन उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १ लाख १८६ मतदान केंद्रांसाठी २ लाख २१ हजार ६०० बॅलेट युनिट, १ लाख २१ हजार ८८६ कंट्रोल युनिट व १ लाख ३२ हजार ९४ व्हीव्हीपॅट इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी ५,१६६ बॅलेट युनिट, ५,१६६ कंट्रोल युनिट व ५,१६५ व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण १८५ विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर १०० मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे - ६ हजार ९५५, नाशिक – ४ हजार ९२२ तर नागपूर येथे ४ हजार ६३१ मतदान केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील २४१ विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही १ लाख १८६ असून त्यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या २४१ इतकी आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
राज्यात शहरी भागातील मतदारांची सोय विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इत्यादी शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण १,१८१ मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात २१० मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत.
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
मतदान केंद्रांची जिल्हानिहाय संख्या
(१) पुणे - 8462 (२) मुंबई उपनगर - 7579 (३) ठाणे - 6955 (४) नाशिक - 4922 (५) नागपूर – 4631 (६) अहमदनगर - 3765 (७) सोलापूर - 3738 (८)जळगाव - 3683 (९) कोल्हापूर - 3452 (१०) औरंगाबाद – 3273 (११) सातारा - 3165 (१२) नांदेड – 3088 (१३) रायगड – 2820 (१४) अमरावती – 2708 (१५) यवतमाळ - 2578 (१६) मुंबई शहर - 2538 (१७) सांगली – 2482 (१८) बीड – 2416 (१९) बुलढाणा – 2288 (२०) पालघर – 2278 (२१) लातूर - 2143 (२२) चंद्रपूर - 2077 (२३) अकोला – 1741 (२४) रत्नागिरी – 1747 (२५) जालना – 1755 (२६) धुळे – 1753 (२७) परभणी – 1623 (२८) उस्मानाबाद - 1523 (२९) नंदूरबार – 1434 (३०) वर्धा – 1342 (३१) गोंदिया – 1285 (३२) भंडारा - 1167 (३३) वाशिम – 1100 (३४) हिंगोली - 1023 (३५) गडचिरोली - 972 (३६) सिंधुदुर्ग – 921
विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली , हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.
मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा,यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते. मतदानासाठी बाहेर पडण्याआधी या ॲपच्या सहाय्याने मतदारांनी आपले मतदान केंदर् तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा केल्याने त्यांना कमी वेळेत मतदान करणे सहजतेने शक्य आहे.
निवडणूक विषयी मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
भारतीय निवडणूक आयोग दिव्यांग नागरिकांसाठी (पीडब्ल्यूडी) मतदार ओळख आणि नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याकरिता हे ॲप विकसित केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इ. माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना या सक्षम ॲपद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल, त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे मतदारसंघ व स्थान निश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर, सहाय्यक, मदतनीस इ. प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत.
सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे दिव्यांगासाठी वापर करणे सोपे होईल. यामध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये आपले मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र, उपलब्ध प्रवेश योग्यता आणि अधिकारी संपर्क या तपशिलाचा समावेश आहे. दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होताना येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल ॲपवर तक्रार नोंदविता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरमध्ये हे अॅप उपलब्ध आहे.
दिव्यांग मतदारांकरिता मतदान केंद्रावर सुव्यवस्थित पोहचण्याकरिता, इमारतीत अधिक सहजपणे प्रवेश करण्यास किंवा भिन्न उंचीच्या भागात सुलभतेने पोहचण्यासाठी प्रत्येक मतदार केंद्राच्या दर्शनी भागामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी प्रवेशसुविधा रॅम्पच्या माध्यमातून सुलभ केली जाणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेत मदतीशिवाय सहभाग घेता यावा यासाठी ब्रेल चिन्हे असलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) देखील उपलब्ध असतील. अंध मतदारांसाठी ब्रेल मतपत्रिका, मतदार स्लिप ब्रेल लिपीमध्ये वाटण्यात आलेली आहे. अंध मतदारांकरिता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ब्रेल डमी, डमी मतपत्राला प्रत्येक मतदार केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे.