election commission team in Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच पथक राज्यात दाखल झालं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी राज्यातील निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेतला. राज्यातील विविध यंत्रणेशी संवाद देखील साधण्यात आला. दरम्यान, राज्यात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मतदान व २० नोव्हेंबरपर्यंत निकाल असा निवडणूक कार्यकम जाहीर होण्याची शक्यता आहे. या साठी आज राज्यात आलेले पथक हे संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचे पथक गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी राज्यातील निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेतला. तसेच विविध राजकीय पक्षांशी देखील निवडणूक आयोगाने चर्चा केली.
या पथकाने शुक्रवारी सर्व पक्षांच्या नेत्यांशी व त्यांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधला. यावेळी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका घ्या अशी मागणी अजित पवार गट, ठाकरे गटाने केली. तसेच उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ही ४० लाख वरून ६० लाख करण्यात यावी अशी मागणी देखील अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यानंतर निवडणूक आयोगाने दुपारी १ वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी व नोडल ऑफिसर यांची बैठक घेतली. तर दुपारी ३ वाजता गुप्तचर व विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सायंकाळी पाच वाजता राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलिस महानिरीक्षक, प्रशासकीय विभागाचे विविध सचिव आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा निवडणूक आयोगाच्या पथकाने घेतला.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आज शनिवारी (ता. २९) राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व जिल्ह्यातील पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षक यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत प्रशासनाची प्रशासकीय तयारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून माहिती, आढावा घेण्यात येणार आहे.
वरील सर्व यंत्रणेचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचे पथक आज दुपारी ३. ४५ ला हॉटेल ट्राइडेंट मधील रूफटॉप हॉलमध्ये पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत आयोग राज्यातील निवडणुकांची घोषणा करणार का ? या कडे राजकीय नेते मंडळींचे लक्ष लागून आहे. सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून प्रत्येक राज्याचा आढावा दौरा करण्यात येतो. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे त्यापूर्वी नवे सरकार स्थापन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. आज निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.