Maharashtra assembly election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार प्रचार करत आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे दिवसभरात चार ते पाच सभा घेत आहेत. जवळपास सर्वच सभांमध्ये राज ठाकरे शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंच्या आरोपांवर आता शरद पवारांनी पलटवार केला आहे. कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? असा टोला शरद पवारांना लगावला आहे.
राज ठाकरे जाहीर सभेत शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, पक्ष फोडले असा आरोप करत आहेत. शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. हा एकप्रकारे जातीयवाद आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. याला आता शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
शरद पवार म्हणाले की, कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचे. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे बाबा. त्यामुळेच आरोप करत असावेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होते. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला आमच्या पक्षामध्ये कोणाला प्रोत्साहन दिले, विधिमंडळात नेतृत्व करायची निवड करायची आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडले ते बघा. मधुकर पिचड यांना नेता बनवले. छगन भुजबळ यांना नेता बनवले. २५ लोकांची यादी देऊ शकतो की, जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती.
शरद पवार म्हणाले की, पुणेरी पगडीबाबत राज ठाकरे जे काही बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मला घालण्यात आली. तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगीकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसे काय म्हणायचे? असे प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले.