राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आलेली पाहाय़ला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकून प्रचंड विजय़ मिळवला तर महाविकास आघाडीची ५० जागा जिंकतानाही दमछाक झाली. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित फॅक्टरही काही ठिकाणी चालला असून याचा २० जागांवर सरळ फटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेतही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला मतांचा टक्का कायम ठेवला असून ही टक्केवारी परिवर्तन आघाडी व मनसेपेक्षा अधिक आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या‘वंचित’ने विधानसभेच्या २०० जागा लढवल्या होत्या. १९४ मतदारसंघांत उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. एका मतदारसंघात दुसऱ्या तर ५८ मतदारसंघांत ‘वंचित’चे उमेदवार तिसऱ्या स्थानी आहेत.
‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना फारच कमी अंतराने पराभवाचा सामना करावा लागला.यामध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार) ८,काँग्रेस ६,शिवसेनेच्या (ठाकरे) ६ आणि एमआयएमच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीत असलेल्या ‘लाडक्या बहिणी’च्या लाटेतही लोकसभेला मिळालेला मतांचा वाटा राखण्यात ‘वंचित’ आघाडी यशस्वी ठरली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नाईक,सतीश चव्हाण,राजेश टोपे,राहुल मोटे,राजेंद्र शिंगणे,फहाद अहमद यांचा अगदी थोड्यात पराभव झाला. तर,काँग्रेसचे वसंत पुरके,दिलीप सानंद,धीरज देशमुख आदि दिग्गज नेत्यांना निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला.
वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मते मिळवल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड आणि तानाजी सावंत यांचा खूपच कमी मतांनी पराभव झाला. तर,दुसरीकडे अतुल सावे, मंदा म्हात्रे, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर, रमेश कराड या उमेदवारांचा कमी मतांनी विजय झाला. या मतदारसंघात वंचितने घेतलेली मते महायुतीला फायद्याची ठरली.
विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या‘वंचित’ आघाडीला एकूण ३.१ टक्के म्हणजेच १४ लाख २२ हजार मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला १५ लाख ८२ हजार म्हणजेच ३.६ टक्के मते मिळाली होती. अल्पसंख्याकबहुल मतदारसंघात ‘वंचित’ने या वेळी मुस्लीम उमेदवार उभे केले होते. यामुळे ‘एमआयएम’ला याचा फटका बसला. या पक्षाचे ‘औरंगाबाद मध्य’चे इम्तियाज जलील आणि आणि ‘औरंगाबाद पूर्व’चे सिद्दीकी नसुरीद्दीन तकुद्दीन या दोन उमेदवारांचा कमी मताधिक्याने पराभव झाला.
राज्यात ‘अनुसूचित जाती’ची ११ टक्के लोकसंख्या असून या विधानसभेला सहा आघाड्यांमधील १४ आंबेडकरी पक्षांनी ६७४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र. यामध्ये एकमेव ‘वंचित’ने स्वबळावर दखलपात्र कामगिरी केली.