महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भल्या भल्यांचे अंदाज फोल ठरवत राज्यात महायुतीची सुनामी पाहायला मिळाली. महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवला असून भाजप, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी २३५ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात महाआघाडीला मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातून महाआघाडी हद्पार झाली असून सांगली जिल्ह्याने थोडाफार हात दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर सर्व दहाच्या दहा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि हातकलंगले या चार जागा जिंकल्या होता. यावेळी या चारही जागांवर काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेली काँग्रेस हद्पार झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार निवडून आला असून तो सुद्धा भाजपचा बंडखोर आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजीत विजय मिळवला आहे. शिवसेना शिंदे गटाने राधानगरी, करवीर आणि कोल्हापूर उत्तर तीन जागा पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कागल तर जनसुराज शक्ती पक्षानेही शाहूवाडी व हातकणंगलेची जागा पटकावली आहे. शिरोळ मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या वाट्याला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा गेल्या आहेत.
Uddhav Thackeray: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांना शंका, म्हणाले…
कोल्हापूरप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. साताऱ्यातील ८ जागांवर महायुती विजयी झाली आहे.
सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीला थोडाफार दिलासा मिळाला आहे. सांगलीत महाविकास आघाडीला तीन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन तर काँग्रेसला १ जागा मिळाली आहे. येथून रोहित आर आर पाटील, जयंत पाटील व विश्वजीत कदम विजयी झाले आहेत.