महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला व महायुतीच्या जबरदस्त सुनामीत महाविकास आघाडीतील घटकपक्ष पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेले. महाआघाडीची इतकी वाताहत झाली की, प्रमुख तिन्ही पक्षांना कसाबसा दुहेरी आकडा गाठता आला. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच युतीला २३० हून अधिक जागा जिंकण्याचा करिष्मा करता आला. महायुतीच्या सुनामीचा अंदाज भल्या भल्यांना आला नाही. अनेक राजकीय विश्लेषकांनी आणि एक्झिट पोल्सनी अटीतटीच्या लढतीची शक्यता वर्तवली होती, मात्र निकालानंतर महाआघाडी महायुतीच्या जवळपासही नव्हती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचा थेट सामना भाजपशी होता, तेथे भाजपचा वरचष्मा राहिला असून काँग्रेस फेल ठरली आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्रात यंदा पहिल्यांदाच महायुती व महाआघाडीमध्ये थेट लढत झाली. अनेक ठिकाणी ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदे सेना, राष्ट्रवादीविरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप विरुद्ध काँग्रेस थेट मुकाबला रंगला होता. यामध्ये महाय़ुतीतील घटक पक्षांनी महाआघाडीला पराभूत केलं. राज्यातील २८८ पैकी ७५ मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. या ७५ जागांपैकी काँग्रेसला केवळ १० जिंकता आल्या तर ६५ जागा भाजपच्या खात्यात गेल्या. मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता, मात्र भाजपने दमदार पुनरागमन करत यश खेचून आणले आहे.
भाजपने राज्यभरात १४९ जागांववर उमेदवार दिले होते, त्यातील १३२ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट ८८ टक्क्यांच्या वर आहे तर काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा शतकी मजल मारली आहे. २०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये १०५ जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे काँग्रेसची ही आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरीआहे. २०१४ मध्ये ४२ आणि २०१९ मध्ये ४४ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागत आहे.
लोकसभेतील पराभवापासून धडा घेत भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले. सरकारने अनेक लोकप्रिय योजनांचा धडाका लावून समाजातील सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. याचा परिणाम निवडणूक निकालातून स्पष्ट दिसत आहे. तसेच निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ६० हजार स्वंयसेवक राज्यातील घराघरापर्यंत पोहोचून प्रचार करत होते. याव्यापक मोहिमेद्वारे तळागाळातील लोकांचे समर्थन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रयत्नामुळे महाआघाडीची रणनिती निष्फळ ठरली.
भाजपकडे बुथस्तरावरून मजबूत संगठन कौशल्य होते तर दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह, तळागाळातील कार्यकर्त्यांमधील वाद आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव, यामुळे काँग्रेसला सर्वात जास्त फटक बसला. महाविकास आघाडीत जागावाटपातही सुसुत्रता नव्हती. परिणामी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, धिरज देशमुख यांच्यासारख्या दिग्गजांनाही आपल्या जागा वाचवता आली नाही. अनेक जिल्ह्यातून काँग्रेस हद्पार झाली आहे.