महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सर्व राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. या निकालाने महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला असून अनेक जिल्ह्यातून महाआघाडी हद्पार झाली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते. नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय झाला आहे.
बाळासाहेब थोरात संगमनेर मतदारसंघातून मागील ८ विधानसभा निवडणुकीत तब्बल ४० वर्षांपासून सलग निवडून येत होते. मात्र, या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांनी थोरातांचा १० हजार ५६० मतांनी पराभव केला. अमोल खताळ यांना १ लाख १२ हजार ३८६ मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना १ लाख १ हजार ८२६ मते मिळाली.
बाळासाहेब थोरातांचा अमोल खताळ या नवख्या उमेदवाराने पराभव केला. थोरात यांच्या पराभवात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा वाटा उचलला.लोकसभेला सुजय विखे यांच्या पराभवासाठी थोरात यांनी पडद्यामागून मदत केली होती. संगमनेरमध्ये विखे यांनी थोरातांचा पराभव होण्यासाठी खुलेपणाने खताळ यांना मदत करून जुना हिशेब चुकता केला आहे.
या पराभवानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले की, माझा पराभव कशामुळे झाला याच्या कारणांचा मी उहापोह करेन. काही दोष असतील तर दुरुस्त करेन. आजवर जनतेने ४० वर्ष मला आमदार म्हणून स्वीकारलं त्यासाठी मी जनतेचे आभार मानतो.
महायुतीच्या या सुनामीत काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून नाना पटोले यांना निसटता विजय झाला आहे.भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी त्यांना निकराची लढत दिली. साकोली मतदार संघातील निवडणूक राज्याच्या अन्य जागांच्या निवडणुकीपेक्षाही अधिक चुरशीची झाली. अंतिम फेरीपर्यंत चुरस कायम होती, मात्र यात नाना पटोले यांनी बाजी मारली.त्यांचाअवघ्या २०८ मतांनी निसटता विजय झाला. यावेळी साकोली मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉक्टर सोबत करंजकर यांना मते मिळाली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले विजयी ठरले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांचा कमी मताधिक्याने विजय झाला होता. २०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात १६ हजार मतांनी पराभव झाला होता.
यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, भाजपकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.