NCP Ajit Pawar Group Winning Candidates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत महायुतीची सुनामी पाहायला मिळाली. महायुतीतील सर्वच पक्षांनी घवघवीत यश मिळवले आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमनेसामने आले होते. अनेक ठिकाणी दोन्ही गटात मुकाबला झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांनी मैदान मारले आहे.
शरद पवारांच्या विरोधात जाऊन अजित पवार सत्ताधारी गटात जाऊन बसले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची केवळ एकच जागा निवडून आल्याने त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. महायुतीला अजित पवारांमुळे नाकारल्याचे भाजप नेते म्हणत होते. त्यानंतर अजित पवारांना महायुतीतून बाजुला केले जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी तारले आहे. राष्ट्रवादीचे जवळपास ४१ आमदार निवडून आले आहेत.
अजित पवार यांना जागावाटपात सर्वात कमी म्हणजे ५५ जागा वाट्याला आल्या होत्या. त्यातील ४१ उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, दत्तात्रेय भरणे आदी मंत्री, नेते विजयी झाले आहेत. हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांनी आक्रमक भाषण करून त्यांना पाड्याचे आवाहन जनतेला केले होते.