Maha Election results : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार मतमोजणी? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha Election results : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार मतमोजणी? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Maha Election results : विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार मतमोजणी? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स

Nov 22, 2024 03:12 PM IST

maharashtra assembly election counting : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले असून उद्या शनिवारी मतमोजणी होणार आहे. या मोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 'या' ठिकाणी पाहता येणार निवडणुकीचा निकाल
विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; 'या' ठिकाणी पाहता येणार निवडणुकीचा निकाल

maharashtra assembly election counting : राज्यात सध्या लोकशाहीकहा उत्सव सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. आता उद्या शनिवारी मतमोजणी होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. या साठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे हे प्रत्येक मतदार संघात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता निकाल काय लागणार ? या कडे सर्वांचे लक्ष आहे.

कधी होणार मतमोजणी सुरू ?

राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक मतदार संघात मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली ही मतमोजणी होणार आहे.

पोस्टल मतांच्या मोजणीने सुरू होणार मतमोजणी

राज्यात यावेळी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. निवडणूक कर्मचारी, पोलिस यंत्रणा, ८५ वर्षांपेक्षा अधिक वृद्ध, विकलांगांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतमोजणीची सुरुवात ही पोस्टल मतदाणाच्या मतमोजणीने केली जाणार आहे. या निवडणुकीत ८५ वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या ६८००० हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि १२००० पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. ३६००० हून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले. तब्बल ४,६६,८२३ पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या होत्या. सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे २८८ मतमोजणी केंद्रांवर १७२३ टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि ५९२ टेबल्स इटीपीबीएमएस (ETPBMS) स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत.

उमेदवारांना देण्यात आली मतमोजणीची माहिती

मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी बाबत प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार, राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.

कुठे पाहता येणार निवडणुकांचे निकाल ?

निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल २८८ मतदार संघाचे निकाल हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर पाहता येणार आहे,

हिंदुस्तान टाइम्स मराठीवर पाहता येणार लाईव्ह निकाल

हिंदुस्तान टाइम्सच्या https://marathi.hindustantimes.com/ या संकेतस्थळावर देखील निवडणुकांचे निकाल पाहता येणार आहे. सकाळ पासून मतमोजणीची माहिती दिली जाणार आहे. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघाच्या निकालाची रिअल टाइम आकडेवारी हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या संकेत स्थळावर अपडेट केली जाणार आहे.

महाविकास आघाडी व महायुतीचा विजयाचा दावा

राज्यात या वर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात एकूण ६६.५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान ५ टक्यांनी वाढले आहे. वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे उद्या निकाला नंतर स्पष्ट होणार आहे. दुपार पर्यंत निवडणुकीच चित्र सष्ट होणार आहे.

महायुतीत भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे तर महाविकास आघाडीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आणि शिवसेना उद्धव ठाकरे या प्रमुख पक्षांचा समावेश आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर