Maharashtra Assembly Election 2024 Result: 'महाराष्ट्रात अनाकलनीय निकाल लागला. या निकालामागील गुपीत शोधून काढावे लागेल. हा निकाल जनतेला मान्य आहे का? मान्य असेल तर काही बोलणार नाही. निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल मी विरोधकांचे अभिनंदन करतो आणि राज्यातील पुढील मुख्यमंत्री भाजपचा असेल, अशी अपेक्षा करतो. राज्यात महागाई वाढली, सोयाबीनला भाव नाही आणि महिला असुरक्षित आहेत, तरीही जनतेने भाजपची निवड कशी केली?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि न समजण्याजोगे आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांत परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणात कशी बदलू शकते, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. कोविडकाळात कुटुंबप्रमुख म्हणून माझे म्हणणे ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असे वागेल, यावर विश्वास बसत नाही. पण आम्ही महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढा देत राहू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महायुतीचा विजय झाला हे, आता जाहीर झालेले आहेच. मी त्यांचे अभिनंदन न करण्याइतका कद्रूपणा दाखविणार नाही, मी त्यांचे अभिनंदन व्यक्त करतो. मी आज टोमणा मारणार नाही. पण आतातरी अस्सल भाजपाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यावे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचा दणदणीत विजय झाला. महाविकास आघाडीच्या तुलनेत एकट्या भाजपला दुप्पट जागा मिळाल्या. २८८ जागांच्या विधानसभेत महायुतीने २०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. लोकसभेतील दमदार कामगिरी केलेल्या महाविकास आघाडीला केवळ ६० जागांवर आघाडी मिळाली.
राजकीय विश्लेषक मनीषा प्रियम म्हणाल्या की, 'भाजपने केलेला एकत्रित प्रचार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला मैदानी प्रचार आणि महिलांनी भाजपच्या बाजूने भरभरून मतदान केल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा रंग बदलला आहे.' महायुतीने राज्यातील २.४ कोटी महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महायुतीसाठी आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे दिसत आहे.
दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने २६० जागा लढवल्या होत्या आणि १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये अविभाजित शिवसेनेसोबत युती करून पक्षाने १५२ जागा लढवल्या आणि १०५ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता भाजपने २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत अधिक जागा जिंकल्या आहेत.