विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचा धुरळा उडत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबईत कुठे ठाकरे विरुद्ध ठाकरे तर काही मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे अशी सरळ लढत होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे काका आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी आक्रमक भाषण करत वरळीवासीयांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं.
मुंबईत येणारे परप्रांतीयांचे लोंढे,दुकानांवरीलमराठी पाट्यांचा मुद्दा, मशिदींवरील भोंगे, टोल नाक्यांवरील आंदोलने,वरळी बीडीडी चाळीचा मुद्दा आणि कोळी बांधवांना साद... असे अनेक मुद्दे मांडत राज ठाकरेंनी आपल्याला सत्ता देण्याची विनंती केली. मात्र वरळीचे विद्यमान आमदार आणि त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एक चकार शब्दही काढला नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अडीच वर्ष बघा. त्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेच्या बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरल हिंदूह्रदयसम्राट नाव काढून टाकलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी हिंदूहृदयसम्राट नाव काढून टाकल्याची,टीकाही राज ठाकरेंनी केली.
वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे संदीप देशपांडे रिंगणात आहेत. संदीप देशपांडेंना विजयी करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले. त्यावेळी संपूर्ण भाषणात राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर टीका तर दूर त्यांच्याविषयी एक चकार शब्दही काढला नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. पण आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला नाही.
आधी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरे उभे असलेल्या माहीममध्ये प्रचार सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे. आता राज ठाकरेंनी वरळीमध्ये सभा तर घेतली पण पुतण्यावर बोलण्याचं टाळलं. राज ठाकरे व उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे.
राज ठाकरे म्हणाले मुस्लिम बहुलभागात आज फतवे काढत आहेत. उद्धव ठाकरे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले ते कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्टच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं. किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं. पण भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरची अडीच वर्ष बघा. त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा पुढील हिंदूह्रदयसम्राट काढून टाकलं गेलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाईट वाटेल, मुस्लिम मतं जातील म्हणून त्यांनी ते काढून टाकलं. काही होर्डिंगवरती तर हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलं होतं. आज ते हयात असते तर एकएकाला फोडून काढले असते. आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात. फतवा काढतात की सगळ्या मुस्लिमांनी एकत्र यावं आपली मतं फुटू नये. आणि सगळी मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी असं फर्मान काढत आहेत, याचे व्हिडिओ काढत आहेत आणि पाठवत आहेत,असा दावा राज ठाकरेंनी केला.
मुल्ला मौलवी फतवा काढत असतील तर आज राज ठाकरे फतवा काढतोय. जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.