राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असूनमहायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होत आहे. मात्र दोन्ही आघाड्यांमधील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याबाबत सातत्याने चर्चा होतअसताना शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.
राज्य स्थापनेपासून आजतागायत महाराष्ट्राला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही, हा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे, असेशरद पवार म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांना सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार का, असा सवाल केला. त्यावर शरद पवार म्हणाले की, लोकसभा वगळता सुप्रिया सुळेंना मी काहीच दिलं नाही. सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. लोक काही चर्चा करतील. पण माझ्या मतानुसार सुप्रिया सुळेंना विधानसभेत इंटरेस्ट नाही. आमच्या पक्षात सर्व नेते बसून निर्णय घेतील. आमच्या पक्षामध्ये विधानसभेचे सदस्य एकत्र बसून निर्णय घेतील. दुसरी गोष्ट अशी बहुमत नाही, निवडणुकीचा निकाल नाही. त्याच्या आधीच मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणं याला अर्थ नाही. असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी वडगाव रासाई येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची मिश्कील शैलीत नक्कल करत म्हटले की,काही लोक बाहेरून येऊन सांगतात, घोडगंगा साखर कारखाना सुरू कसा होतो ते मी पाहतो.’ तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी एका नेत्याने अमोल कोल्हे निवडून येतो की नाही ते पाहतो, असे म्हटले होते. पण, लोकांनी आपली जबाबदारी ओळखत कोल्हे यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून दिले, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.