Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून अनेक उमेदवार मोठं शक्तीप्रदर्शन करत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. दिवाळीनंतरच बड्या नेत्यांच्या जाहीर सभांचा फड गाजणार असला तरी सोशल मीडियावरून एकमेकांवर होत असलेल्या टीका-टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण हळू-हळू तापू लागले आहे. यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आघाडी घेतली असून विरोधकांवर जोरदार टोलेबाजी सुरू केली आहे. शरद पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाने (Nationalist Congress party shardchandra pawar ) सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या टीझरमध्ये दिसते की, महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याच्या देहबोलीशी मिळताजुळता एक व्यक्ती आरशात पाहून म्हणत आहे की, मी कुणालाही घाबरत नाही, कितीही चौकशा लावा मी घाबरत नाही. त्याचबरोबर काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला‘ मी पुन्हा येईन’ हा डॉयलॉगही हा व्यक्ती म्हणत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, एका भिंतीवर एका राष्ट्रीय पक्षाच्या राज्यातील बड्या नेत्याचा फोटो लटवलेला आहे. मात्र फोटा अस्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओमधील नेत्याच्या तोंडून मी पुन्हा येईन डायलॉग ऐकून तेथे उभ्या असलेल्या दोन व्यक्तींपैकी एक जण म्हणतो, वा भाऊ तुमचा डॉयलॉग एकदम भारी. त्यावर दुसरा व्यक्ती म्हणतो भारी तर तुतारी आहे!!
इतक्यात वॉचमन धावत पळत येतो व म्हणतो की, भोपळा भाऊ.. भोपळा भाऊ बाहेर तुम्हाला भेटायला मतदार आलेत, व तुम्हाला त्यांनी गिफ्टही आणलंय. गिफ्टचं नाव काढताच नेता आनंदित होतो. बाहेर काही लोक मोठा बॉक्स घेऊन आलेले असतात व त्यातून भोपळा काढून म्हणतात हे गिफ्ट नाही तर रिटर्न गिफ्ट आहे, निवडणुकीत तर तुम्हाला यापेक्षा मोठा भोपळा देणार आहोत. कारण तुम्हा महाराष्ट्राला भोपळाच दिला आहे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी हक्क मागतोय महाराष्ट्र अशी टॅगलाईन येते.
भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम या मतदारसंघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचे औक्षण करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांची यंदाची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.
दरम्यान काल (२४ ऑक्टोबर) गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बड्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये आदित्य ठाकरे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड तसेच अन्य पक्षातील अनेक नेत्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढत चालली आहे.
संबंधित बातम्या