सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर पक्षानं तसं पत्रकही प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील तर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे हे निवडणूक लढणार आहेत.
मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी हे आमदार आहेत. चौधरी हे कट्टर शिवसैनिक असून मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यांच्या मतदारसंघात येणारे विभाग हे शिवसेनेचे परंपरागत बालेकिल्ले आहेत. त्यामुळं बाळा नांदगावकर यांना इथं कडवी लढत द्यावी लागणार आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, त्यावरही पुढची बरीच गणितं अवलंबून असतील.
पंढरपूर विधानसभेचं प्रतिनिधित्व सध्या भाजपचे आमदार समाधान औताडे करत आहेत. माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर समाधान औताडे यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. पोटनिवडणुकीत त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. आता मनसेकडून दिलीप धोत्रे आव्हान देणार आहेत.
पंढरपूर मतदारसंघातून मनसेनं उमेदवारी दिलेले दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. विद्यार्थी सेनेच्या काळापासून ते राज यांच्यासोबत आहेत. शिवसेना सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून राज यांना नि:संदिग्ध पाठिंबा देणाऱ्यांमध्ये धोत्रे एक होते. सोलापुरात ते चिरपरिचीत आहेत. ते सध्या मनसेच्या नेते पदी आहेत. पंढरपुरातून ते प्रस्थापितांना आव्हान देऊ शकतात असा मनसेला विश्वास आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं जाण्याची शक्यता आहे. शरद पवार तिथं काय खेळी करतात यावरही बरंच काही ठरेल.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. मात्र, ते आपल्या निर्णयाचा फेरविचार करून महायुतीशी चर्चा करतील, असं वक्तव्य महायुतीच्या काही नेत्यांनी केलं होतं. आता थेट उमेदवारांची घोषणा केल्यानं राज ठाकरे माघार घेतील, ही शक्यता दुरापास्त आहे.