Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. मात्र, अर्ज भरल्यानंतर जे चित्र समोर आलं आहे त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोघांच टेन्शन वाढलं आहे. या दोन्ही आघाड्यांना मोठ्या संख्येने बंडखोर उमेदवारांचा सामना करावा लागत आहे. हे बंडखोर राजकीय गणित बिघडवणार आहेत. त्यामुळे नाराज उमेदवार आणि बंडखोर पक्षांना अर्ज मागे घेण्याची मनधरणी करत आहेत. खरं चित्र हे ४ नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तब्बल ५० पेक्षा जास्त उमेदवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. सर्वाधिक बंडखोर उमेदवार हे महायुतीत आहेत. ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यामध्ये भाजपचे १९ आणि शिंदे सेनेच्या १६ उमेदवारांचा समावेश आहे, तर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
महाविकास आघाडीबद्दल बोलायचे झाले तर सर्वाधिक बंडखोर काँग्रेसचे आहेत. काँग्रेसच्या १० उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. कुर्ला, दक्षिण सोलापूर, परांडा, सांगोला आणि पंढरपूर मधून महाविकास आघाडीच्या १४ बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी बंडखोरांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना निवडणूक रिंगणात उभे केले आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंडखोरावर चर्चा झाली होती. त्यात अंतर्गत बंडखोरी आणि वाढत्या संघर्षाला आळा घालण्यावर भर देण्यात आला. बंडखोर उमेदवारांची मनधरणी करून त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजप हा मोठा पक्ष असून त्यात निवडणूक लढवणारे अनेक नेते आहेत. पण युतीत सर्वांना संधी मिळू शकत नाही. आमच्या काही मर्यादा आहेत आणि आम्ही प्रत्येकाला उमेदवारी देऊ शकत नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नऊ बंडखोरांनी ज्या मतदारसंघातून भाजपने आधीच उमेदवार उभे केले आहेत, त्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नवी मुंबईतील ऐरोली, मुंबईतील अंधेरी पूर्व, जळगाव जिल्ह्यातील पेचोरा आणि ठाण्यातील बेलापूर या जागांचा समावेश आहे. अंधेरी पूर्वमधून माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी आणि मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे ज्या जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्या जागांवर भाजपच्या १० बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये रायगडमधील अलिबाग, कर्जत, मुंबई उपनगरातील बुलढाणा, बोरिवली आणि जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भाजपच्या नऊ बंडखोर आणि शिवसेनेच्या सात बंडखोर उमेदवारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीविरोधात डोके वर काढले आहे. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या एकमेव बंडखोर उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीतही परिस्थिती फारशी चांगली नाही. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी, मुंबईतील भायखळा आणि नागपुरातील रामटेक येथे काँग्रेसमधील चार बंडखोर उमेदवारांनी आपल्या अधिकृत मित्रपक्षाविरोधात अर्ज दाखल केले आहेत. मुंबई उपनगरातील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाराष्ट्र सपाचे अध्यक्ष अबू असीम आझमी यांनी देखील येथून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय मुंबई उपनगरातील वर्सोवा आणि बुलढाण्यातील मेहकर मतदारसंघातही सेनेच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती यांच्याविरोधात एका बंडखोर उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. इतर काही जागांवर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी पक्षाचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेसविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक झाली. मात्र, अद्याप तोडगा न निघल्याने महाविकास आघाडीत देखील बंडखोरांची मनधरणी करून त्यांना माघारी घेण्यास मनवले जात आहे.