महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून महाविकास आघाडीची जागावाटपावर घोडं अडलं होतं. मात्र आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीचा संभाव्य फॉर्म्युला ठरला असून यामध्ये महाराष्ट्रात काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या फॉर्म्युल्यानुसार जागावाटपात काँग्रेस महाराष्ट्रात सर्वाधिक जागा लढवणार असून मुंबईत सर्वाधिक जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे. काँग्रेस १०५ ते ११०, शिवसेना ठाकरे ९० ते ९५ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ८० ते ८५ जागा लढवण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकारण बदललं असून याआधी प्रमुख ४ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते, तेव्हा युती आणि आघाडीत प्रत्येक पक्ष १०० पेक्षा जास्त जागा लढवत होता. मात्र पहिल्यांदाच शरद पवार आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच १०० हून कमी जागांवर लढणार आहेत.
मविआची आज जागावाटपावर मुंबईत बैठक झाली. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात विदर्भातील काही जागांवरून वाद होता. मुंबईतील बैठकीत या जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. हा वाद दिल्ली हायकमांडजवळही पोहचला. हरियाणा निकालानंतर धडा घेतलेल्या काँग्रेसनं महाराष्ट्रात चूक नको, यासाठी लवकरात लवकर हा वाद मिटवण्याचे नेत्यांना आदेश दिले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांना मविआतील समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब थोरात यांनी आज शरद पवारांची भेट घेतली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेत वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची स्थापना केली होती. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडून महायुती आकाराला आली. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रमुख लढत होत आहे. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे प्रमुख पक्ष आहेत.
संबंधित बातम्या