राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचारामुळे राजकीयरण तापू लागलं आहे. यंदा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये थेट लढत असून दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महायुतीची लाडकी बहीण योजना प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. यावरून महायुतीचे नेते महिलांना दमदाटी तसेच वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर आणखी एका महिला नेत्यानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरकारनं १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, असं वक्तव्य भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघारानी जाधव (Megharani Jadhav) यांनी केलं आहे. जाधव यांच्या वक्तव्याविरोधात कोल्हापुरातील राजकीय वातावरण कमालीचं तापल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. घोषणेपासून ही योजना महिलांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. मात्र या योजनेवरून महायुतीचे नेते वादग्रस्त वक्तव्य करत असून ही योजना महायुतीवरच बुमरँग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काही दिवसापूर्वी भाजप खासदार धनंजय महाडिक यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्यास त्यांची नावे लिहून घ्या, त्यांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो, असे विधान महाडिक यांनी केले होतं. त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या महिला उपाध्यक्ष मेघाराणी जाधव यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
१५०० दिलेत,महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, अस वक्तव्यं जाधव यांनी केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होत आहे. करवीर पन्हाळा गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गारीवाडे येथे आयोजित प्रचार सभेत मेघारानी जाधव बोलत होत्या.
कोल्हापुरातील करवीर मतदारसंघात यंदा दिवंगत पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा मिळून हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापुरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जात आहे. साल २०१९ मध्ये येथे काँग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. २००९ व २०१४ च्या निवडणुकीत पीएन पाटील यांचा पराभव झाला होता.