Bandra West assmebly constituency : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यातील प्रमुख पक्षांनी आतापासूनच तयारी केली आहे. इच्छुकांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबईतील जागावाटपामध्ये काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेत खेचाखेची असली तरी काही जागांवर काँग्रेसनं तयारी सुरू केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना घेरण्याची रणनीती महाविकास आघाडीनं आखली आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून माजी खासदार प्रिया दत्त यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे. ती काही दिवसांतच पूर्ण होईल असं वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्याआधीच तिन्ही पक्षांनी काही जागांवर उमेदवार निश्चिती सुरू केली आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून माजी खासदार प्रिया दत्त यांच्या नावाची चर्चा आहे.
वांद्रे पश्चिम हा मतदारसंघ लोकसभेच्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात येतो. याआधी दोन वेळा प्रिया दत्त यांनी लोकसभेत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याआधी त्यांचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त इथून खासदार होते. त्यामुळं इथं दत्त कुटुंबीयांचं वर्चस्व आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघात बॉलिवूड कलाकारांचं वास्तव्य आहे. शिवाय, इथं मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल असल्याचं मानलं जातं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडून आल्या आहेत.त्यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. मात्र, वांद्रे पश्चिम मतदारसंघातून निकम यांना ३ हजारांच्या आसपास मतांची आघाडी मिळाली होती. ही आघाडी विधानसभा निवडणुकीत सहज मोडून काढता येऊ शकते असा काँग्रेसचा विश्वास आहे. प्रिया दत्त यांच्यासारखा चेहरा असेल तर ते शक्य होऊ शकतं. शिवाय यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेची ताकदही काँग्रेसला मिळेल, असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं.
हा मतदारसंघ वाटाघाटीत काँग्रेसकडं येऊ शकतो. आतापर्यंत दोन्ही मतदारसंघ काँग्रेस लढवत आली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसनं वांद्रे पूर्व मतदारसंघ जिंकला होता. झिशान सिद्दीकी हे तिथून निवडून आले होते. आता ते अजित पवारांच्या गटात गेले आहेत. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना इथून लढण्याची तयारी करत आहे. याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळं या जागेसाठी ते आग्रही आहेत. त्या बदल्यात वांद्रे पश्चिम मतदारसंघ काँग्रेसला मिळू शकतो.