Baramati Vidhan Sabha election latest news : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत अजित पवार अत्यंत सावध झाले आहेत. बारामती विधानसभेतून निवडणूक न लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यांच्या ऐवजी जय पवार हे इथून निवडणूक लढतील, अशी दाट शक्यता आहे.
स्वातंत्र्यदिना निमित्त ध्वजारोहण करण्यासाठी आज अजित पवार पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बारामती विधानसभा मतदारसंघातून जय पवार यांना उमेदवारी देण्याचा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे, असा प्रश्न अजित पवार यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सकारात्मक उत्तर दिलं.
'शेवटी लोकशाही आहे. मी सात ते आठ निवडणुका लढलेल्या आहेत. त्यामुळं मला आता निवडणूक लढण्यामध्ये रस नाही. बारामती विधानसभेतील कार्यकर्त्यांचं तसं म्हणणं असेल तर पक्षाच्या संसदीय समितीमध्ये त्याविषयी निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.
जय पवार हे अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत. लोकसभा निवडणुकीत ते बारामतीमध्ये प्रचारकार्यात सक्रिये होते. त्यामुळं त्यांना विधानसभेत उतरावे अशी पक्षात एक चर्चा आहे. तसं झाल्यास जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत बारामती विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. अजित पवार यांनी आक्रमक प्रचार करूनही त्यांच्या पत्नीली तब्बल दीड लाख मतांनी दारुण पराभव पत्करावा लागला. इतकंच नव्हे, ज्या बारामती विधानसभेतून अजित पवार निवडून येतात, तिथं सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळालं होतं. तेव्हापासूनच या मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडं तसा आग्रह धरला आहे. नुकत्याच झालेल्या एका सभेत जयंत पाटील यांनी तसे संकेतही दिले आहेत.
युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. बारामतीमधील सामाजिक कार्यातही ते सक्रिय आहेत. ते विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत. तसंच, बारामती तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं. मितभाषी व संयमी अशा युगेंद्र पवारांबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपुलकी आहे.