गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

Nov 10, 2024 08:52 PM IST

Uddhav Thackeray sangola Rally : गेल्यावेळी आपण एका गद्दाराला उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. पण त्यानं संधीचं सोनं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यात केली.

सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचे सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील (shahajibapu patil) यांच्यावर प्रचंड टीका करत जोरदार फटकेबाजी केली. मला सांगा रेल्वेत कुणाची ओळख आहे का? नाही, तिकीट पाहिजे. २४ तारखेचं एकच तिकीट पाहिजे, ते सुद्धा गुवाहाटीचं. परत जाऊद्या त्यांना. काय झाडी, काय डोंगर…, बसा तिकडे झाडं मोजत, असा जहरी टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

२३ तारखेला रायगडाचं टकमक टोक दिसणार -

उद्धव ठाकरे म्हणाले,प्रत्येकाच्या नशिबानुसार देव संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं की,माती करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. गेल्यावेळी आपण एका गद्दाराला उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. पण त्यानं संधीचं सोनं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं.या गद्दाराला आता सांगा गुवाहाटीचा डोंगर तू पाहिलास, पण रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस. ते तुला २३ तारखेला दिसणार आहे. टकमक टोकावरुन हे सर्वजण तुझा कसा राजकीय कडेलोट करतील ते बघ.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी गेल्यावेळीच दीपक आबांना उमेदवारी देणार होतो. तसं बोलणंही झालं होतं. पण मध्येच एक धरण फोडणारा खेकडा घुसला. कोण तुम्हाला माहिती आहे, त्याने सांगितलं की, साहेब माझं ऐका. हा शंभर टक्के निवडून येतोय. मी म्हटलं, ठिक आहे. मी दीपक आबांना विनंती केली की, साहेब जरा माफ करा. असं मला सागांवं लागले. त्यांचं मला कौतुक आहे कारण त्यांनी लबाडी केली नाही. गद्दारी केली नाही. ते म्हणाले, ठिक आहे, उद्धवजी मी निवडून आणतो. असा शिवसैनिक पाहिजे, तुमच्यासाठी लढणारा. याला म्हणतात सैनिक, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवाराचे कौतुक केलं.

अमित शहांचा स्मृतीभ्रंश झालाय -

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात ठाण मांडून आहेत. त्यांची अवस्था मुन्नाभाई चित्रपटातील सर्किटसारखी झाली आहे. येथे येऊन शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी ते काश्मीरमधील कलम ३७० बद्दल बोलतात. माझ्यावर टीका करताना म्हणतात की, आम्ही अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध करणाऱ्यांच्या बरोबर आहोत. कदाचित अमित शहा यांना स्मृतीभ्रंश झाला असावा, कारण ज्यावेळी कलम ३७० रद्द झाले, त्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले होते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

 

Whats_app_banner