Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पालघर (Palghar) जिल्ह्यातील एका मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे (VBA) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. तसेच महाराष्ट्रातील खोकासूर आणि भ्रष्टासूरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असेही त्यांनी तुळजाभवानीला साकडे घातले आहे.
उद्धव ठाकरे सध्या तुळजापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विनोद तावडे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचं आताच तुमच्याकडून समजले. महाराष्ट्रातील खोकासूर आणि भ्रष्टासूरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असे साकडे मी तुळजाभवानीच्या चरणी घातले आहे. आई तुळजाभवानी आशीर्वाद देणार, याची मला खात्री आहे. तसेच काल अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला. तो दगड तपासण्याचे काम कोणी करायचे होते? म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडे घातले आहे, भ्रष्ट राजवट एकदा या राज्यातून खतम करुन टाक’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी पालघर जिल्ह्यातील एका मतदारसंघातील मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. मात्र, ठाकूर यांचा दावा हा केवळ पब्लिसिटी स्टंट असून महाविकास आघाडी पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याने हे आरोप करत असल्याचे सांगत भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
पत्रकारांशी बोलताना ठाकूर म्हणाले की, 'भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे मतदारांना प्रभावित करण्यासाठी पाच कोटी रुपये देण्यासाठी विरारला येत असल्याची माहिती भाजपच्या काही नेत्यांनी मला दिली. त्यांच्यासारखा राष्ट्रीय नेता अशा क्षुल्लक कामात उतरणार नाही, असे मला वाटले. पण मी त्यांना येथे पाहिले. मी निवडणूक आयोगाला विनंती करतो की, त्यांच्यावर आणि भाजपवर कारवाई करावी.'
महाराष्ट्रा उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र, यापूर्वीच विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.