पंकजाताई, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस; मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी मानले आभार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पंकजाताई, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस; मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी मानले आभार!

पंकजाताई, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस; मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी मानले आभार!

Nov 17, 2024 10:06 PM IST

Uddhav Thackeray on Pankaja Munde: मुंबई येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.

मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडे यांचे आभार
मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंनी मानले पंकजा मुंडे यांचे आभार

Uddhav Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राज्यात राजकीय पक्षांच्या सभा सुरू आहेत. नुकतीच मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे आभार मानले. 'मी पंकजाला खास धन्यवाद देतो की, तिने महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेवरच्या डोळ्यावरची पट्टी काढली अन स्वत:च्या डोळ्यावर बांधली. पण पंकजाने तसे काही केले नाही', असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की,'राज्यात महाविकास आघाडी जिंकली तर राज्यभर फटाके फुटतील. पण महायुती जिंकली तर, त्याचा जल्लोष गुजरातमध्ये पाहायला मिळेल. पंकजाताई, तू एक फार मोठे काम केले आहेस, तू महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरुन काढून स्वत:च्या डोळ्यावर बांधली, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढली', असे उद्धव ठाकरे म्हणाले. 'पंकजा ताई म्हणाल्या की, भाजपाचे काम खूप भारी आहे. महाराष्ट्रात ९० हजार बुथ आहेत. प्रत्येक बुथवर भाजपाचे दक्षता पथक आहे. या पथकात जर दोन माणसे असतील तर त्यांची संख्या १ लाख ८० हजार होते. जर दोन पेक्षा जास्त लोक असतील तर त्या पटीत त्यांची संख्या वाढेल. ही सर्व लोक भाजपाने गुजरातमधून आणली आहेत', असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भाजपने ही माणसे आपल्यावर नजर ठेवायला आणली. आज नजर ठेवायला माणसे आणली. उद्या त्यांचा मुंबई आणि महाराष्ट्र बळकविण्याचा डाव आहे. हे तर फेक नरेटिव्ह नाही ना, कारण हे मी पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलत आहे. याचा अर्थ भाजप महाराष्ट्रात पराभूत झाले आहे. त्यांचे लोक येथे राहिलेले नाहीत. राज्यातील जनतेचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळेच त्यांना परराज्यातून माणसे आणून नजर ठेवावी लागत आहे.’

बटेंगे तो कटेंगे घोषणेवर उद्धव ठाकरेंना संताप

'महायुतीकडून बटेंगे तो कटेंगे घोषणा दिल्या जात आहेत. मी मुख्यमंत्री असतो तर, यांची अशी हिंमत झाली नसती. पण लक्षात घ्या, मुंबईवर घाला घातला तर ‘हम तुम्हे काटेंगे’, असे हिंदीत म्हणत उद्धव ठाकरे यांनी महायुतीला इशारा दिला.

Whats_app_banner