राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली असून प्रचाराला वेग आला आहे. मात्र प्रचाराची सुरुवात होत असतानाच ठाकरे गटाच्या आमदाराला हृदयविकाराचा झटका आला. जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनावणे यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना वाहनातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तपासणीत त्यांच्या हृदयाला ब्लॉकेज असल्याचं समोर आल्यानंतर प्रभाकर सोनावणे यांच्यावर तातडीने अँन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
प्रभाकर सोनावणे ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर चोपडा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात ठाकरेंनी आधी राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र परंतु उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्यादिवशी अचानक उमेदवार बदलून भाजपातून ठाकरे गटात आलेल्या प्रभाकर सोनावणे यांना उमेदवारी दिली गेली.
प्रभाकर सोनावणे चोपडा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ममुराबाद येथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर जवळच्या खासगी रुग्णालयात प्रभाकर सोनावणे यांना नेले, तिथे त्यांच्या हृदयाला २ ब्लॉकेज असल्याचं समोर आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी यशस्वीपणे अँजिओप्लास्टी केली आहे. सध्या प्रभाकर सोनावणे यांची प्रकृती स्थिर असून येत्या ३-४ दिवसांत ते प्रचारात सक्रीय होतील अशी माहिती त्यांचे पुत्र दिनेश सोनावणे यांनी दिली.
चोपडा मतदारसंघात विद्यमान आमदार लता सोनावणे या शिवसेनेच्या आमदार होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर लता सोनावणे या एकनाथ शिंदेंसोबत गेल्या. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरेंना उमेदवार शोधावे लागले. महायुतीने या मतदारसंघात लता सोनावणे यांचे पती चंद्रकांत सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरेंनी प्रभाकर सोनावणे यांना रिंगणात उतरवलं आहे.
संबंधित बातम्या