Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. राज ठाकरेंच्या सभांच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या असताना त्यांची बीड येथील सभा रद्द करण्यात आली. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सभा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना चिमटा काढला. कदाचित ते झोपतून उठले नसतील म्हणून त्यांची सभा रद्द करण्यात आली असावी, असे सुषभा अंधारे यांनी म्हटले आहे.
सांगली येथे प्रचारदरम्यान सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याची माहिती दिली. दरम्यान, राज ठाकरेंची अंबाजोगाईमधील रद्द झालेल्या सभेवरून सुषमा अंधारे यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, 'राज ठाकरे यांची सभा माझ्या जिल्ह्यात अंबाजोगाईला होती. पण ते तिथे पोहोचलेच नाही. कदाचित ते झोपेतून उठले नसतील, असेही असू शकते. परंतु, जी माणसे बिनशर्त पाठिंबा देतात आणि एक जागा निवडून आणण्यासाठी इतर लोकांवर दबाव टाकण्याचे राजकारण करतात, त्यांच्याबाबत फार बोलण्याची गरज नाही.'
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बटेंगे तो कटेंगे विधानाबाबत युटर्न घेतल्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.'पंकजा मुंडे या १२ वर्षे वनवासात होत्या,आता कुठे त्या स्थिर झाल्यात ,त्यामुळे त्यांची इच्छा असली तरी बऱ्याच गोष्टी त्यांना इच्छेविरुद्ध कराव्या लागतात', अशा सुषमा अंधारे म्हणाल्या. तसेच त्यांच्याच महायुतीतील पार्टनर असणाऱ्या अजितदादांनी देखील याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे, असेही मत अंधारे यांनी व्यक्त केले.
राज्यात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास (काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आघाडी आणि महायुती (भाजप,शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात मुख्य लढत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकून दमदार कामगिरी केली होती, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.